विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने देशातल्या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या १४ वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या बहिष्काराच्या निर्णयावर भाजपा आणि एनडीएतील पक्षांनी टीका केली आहे. तसेच न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल असोसिएशनने (एनबीडीए) याचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, इंडिया आघाडीतले सदस्य असलेल्या जनता दलचे (युनायटेड) प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. नितीश कुमार म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीश कुमार म्हणाले, आम्ही पत्रकारांच्या विरोधात नाही. आपल्या देशात सर्वांना स्वातंत्र्य आहे. त्यामुळे पत्रकारांना वाटेल ते त्यांनी लिहावं. पत्रकार त्यांच्या मनात येईल ते लिहू शकतात. पत्रकारांना नियंत्रित केलं जातंय का? मी असं केलंय का? पत्रकारांना त्यांचे अधिकार आहेत. मी कोणाच्याही विरोधात नाही. केंद्रात आहेत त्यांनी गडबड केलीय, ते काही लोकांना नियंत्रित करत आहेत. परंतु, मी तर पत्रकारांचा आदर करतो.

बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले, आमच्याबरोबर जे लोक आहेत त्यांना वाटलं असेल की माध्यमांमध्ये काहीतरी गडबड सुरू आहे. तसं असलं तरी आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. आपण सगळे स्वतंत्र आहोत, तर पत्रकारांनाही स्वातंत्र्य आहेत. त्यांनाही लिहिण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी लिहावं.

इंडिया आघाडीच्या बहिष्काराचं कारण काय?

इंडिया आघाडीतील वेगवेगळे पक्ष एकूण ११ राज्यांमध्ये सत्तेत आहेत. या सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या १४ वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकला आहे. याबाबत काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा म्हणाले, “आपण दररोज संध्याकाळी ५ वाजता काही वृत्तवाहिन्यांवर द्वेषाचा बाजार सुरू झालेला पाहतो. गेल्या नऊ वर्षांपासून ते सातत्याने सुरू आहे. या बाजारात वेगवेगळ्या पक्षांचे प्रवक्ते, नेते जातात. यात काही तज्ज्ञ, काही विश्लेषकही असतात. हे सगळे या बाजाराचा एक भाग होऊन जातात. त्यामुळे जड अंत:करणाने आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही या कोणत्याही वृत्तनिवेदकाला विरोध करत नाही. आम्ही त्यांचा द्वेषही करत नाही. मात्र, आम्हाला या द्वेषाचा भाग व्हायचं नाही. आम्ही आमच्या देशावर खूप प्रेम करतो. त्यामुळे हा द्वेष थांबवण्यासाठी शक्य तितके सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. याच कारणामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे,”