बिहारमध्ये नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबरची महाआघाडी तोडून पुन्हा एकदा भाजपाशी घरोबा केला आहे. नितीश कुमार हे सातत्याने आपली भूमिका बदलत असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. नितीश कुमार यांनी महाआघाडी तोडल्यापासून राजदचे नेते आणि माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव हे नितीश कुमार यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, तेजस्वी यादव यांनी दावा केला आहे की, “आम्ही सत्तेत आल्यापासून राज्याचा विकास केला. एका थकलेल्या मुख्यमंत्र्याला आम्ही राज्यात विकासकामं करायला लावली.” तेजस्वी यादव यांच्या या टीकेला नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीश कुमार यांनी काही वेळापूर्वी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, तेजस्वी यादव केवळ फालतू बाता मारतायत. त्यांनी राज्यातल्या किती लोकांना रोजगार दिला? राज्यातील शिक्षणव्यवस्थेसाठी काय केलं? राज्यात जेव्हा त्यांचं सरकार होतं, तेव्हा भीषण परिस्थिती होती. राज्यातले लोक संध्याकाळ झाली की घराबाहेर पडत नव्हते. राज्याची काय स्थिती होती हे सर्वांना माहिती आहे. आम्ही सत्तेत आल्यावर राज्याचा विकास केला. मोठमोठ्या इमारती बांधल्या. तेजस्वी आत्ता बच्चे आहेत, ते आत्ता राजकारणात आले आहेत. त्यांना काहीच माहिती नाही.

नितीश कुमार म्हणाले, २००५ पासून राज्यात खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली. आम्ही वैद्यकीय क्षेत्रात लक्ष घातलं. लोकांना उपचारांसाठी पैसे दिले. राज्यात रस्ते नव्हते, आम्ही राज्यभर रस्ते बांधले. लोकांच्या घरापर्यंत रस्ते बांधून दिले. ते (लालू प्रसाद यादव) केंद्रात मंत्री होते, राज्यातही त्यांची सत्ता होती. तरी त्यांनी राज्यात काहीच काम केलं नव्हतं. आता राज्यातल्या जनतेला पायी प्रवास करावा लागत नाही. पूर्वी रस्ते नव्हते आणि सार्वजनिक वाहतूक प्रणालीदेखील नव्हती.

हे ही वाचा >> “मनोज जरांगे पाटील यांच्यात हिमंत असेल तर..”, छगन भुजबळ यांचा थेट इशारा

काय म्हणाले होते तेजस्वी यादव?

तेजस्वी यादव म्हणाले होते, आम्ही खूप अपेक्षांसह सरकार स्थापन केलं होतं. ज्या उद्देशाने आम्ही सरकार बनवलं ती उद्दीष्टे नितीश कुमार यांनी त्यावेळी सांगितली होती. ते आता भाजपाबरोबर गेले आहेत. त्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. त्यामुळे त्यांना राज्यातली जनताच उत्तर देईल. त्यांनी किंवा इतर कोणीही आता केवळ कामाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. कामं आणि राज्याच्या विकासावर बोललं पाहिजे. कोण काय बोलतंय, काय बोलत नाही यावर चर्चा करण्याला काहीच अर्थ नाही. जे झालं तो आता इतिहास आहे. आम्ही पुढचा विचार करत आहोत. आम्ही जो विचार डोळ्यासमोर ठेवून सरकार बनवलं होतं, आमचं जे व्हिजन होतं ते नक्कीच पूर्ण करू. खेळ अजून बाकी आहे, आम्ही मिळून जनतेची स्वप्नं पूर्ण करू.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar says tejashwi yadav was child when we developed bihar asc