राष्ट्रपती निवडणूक १७ जुलै रोजी होणार आहे. नितीशकुमारांनी तर राष्ट्रपतीपदाचे एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. मात्र या सगळ्यात राहुल गांधींच्या हस्तक्षेपामुळे समीकरणं बदलण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. कारण काँग्रेसच्या एकाही नेत्याने नितीशकुमारांच्या विरोधात काहीही बोलायचे नाही असे आदेशच राहुल गांधींनी देऊन टाकले आहेत.

जदयूनेही आजच उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे घोडामैदान जवळ आलेली राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता आणखी रंगण्याची शक्यता आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नितीशकुमार यांच्या विरोधात काहीही न बोलण्याची ताकीद दिली आहे. तसेच आत्तापर्यंत ज्या काँग्रेस नेत्यांनी नितीशकुमारांच्या विरोधात वक्तव्ये केली आहेत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि जदयू यांच्यात निर्माण झालेली दरी काही प्रमाणात मिटताना दिसते आहे. या सगळ्याचा परिणाम राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर होणार का? जदयू आपली भूमिका बदलून मीरा कुमार यांना पाठिंबा देणार का? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.

रामनाथ कोविंद यांचे नाव एनडीएकडून जाहीर होताच जदयूने त्यांना आपला पाठिंबा दिला होता. त्यानंतर राजदचे लालूप्रसाद यादव यांनीही नितीशकुमारांची मनधरणी केली होती पण ती फोल ठरली होती. एवढंच काय मीरा कुमार यांना हरवण्यासाठीच रिंगणात उतरवलेत ना? असा खोचक प्रश्नही नितीशकुमार यांनी विचारला होता. ज्यानंतर काँग्रेस आणि जदयू यांच्यातली दरी वाढल्याचे दिसून आले होते.

काँग्रेसने नितीशकुमारांची प्रतिमा खराब केली अशी टीका काही दिवसांपूर्वीच जदयू चे ज्येष्ठ नेते के.सी. त्यागी यांनी केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढाकार घेऊन नितीशकुमारांविरोधात बोलणाऱ्यांना गप्प बसायला सांगितले आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे यात शंकाच नाहीये, नितीशकुमारांचा पाठिंबा ऐनवेळी कोविंद यांच्याऐवजी काँग्रेस प्रणित उमेदवार मीरा कुमार यांना मिळाला तर काँग्रेसला ते हवेच आहे. अशात आता नितीशकुमारांच्या मनधरणीसाठी राहुल गांधी यांनी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

या चर्चेमुळेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची समीकरणे बदलण्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे. त्यामुळे जदयू काय करणार, नितीशकुमार त्यांची भूमिका बदलणार का? आणि राहुल गांधींची शिष्टाई यशस्वी ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader