नवी दिल्ली : सेवा अधिकारांच्या नियंत्रणाबाबत केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण’ स्थापन करण्यासाठी शुक्रवारी जारी केलेल्या वटहुकमाविरोधात दिल्लीतील ‘आप’ सरकारला अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत आहे, तर तृणमूल काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी केजरीवाल त्यांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना रविवारी जाहीर पाठिंबा दिला.

नितीश कुमार यांनी रविवारी दिल्लीत केजरीवाल यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी प्रशासकीय सेवांबाबतच्या नियंत्रणावरून केंद्राशी सुरू असलेल्या दिल्लीतील आप सरकारच्या संघर्षांत केजरीवाल यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आणि ‘‘तुम्ही निवडून आलेल्या सरकारची सत्ता कशी काढून घेऊ शकता,’’ असा प्रश्न करीत भाजपवर टीकास्त्र सोडले.

केजरीवाल २३ मे रोजी कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, २४ मे रोजी मुंबईत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.नितीश कुमारांच्या भेटीबद्दल केजरीवाल म्हणाले, ‘‘नितीशजी मला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला आले आहेत. ते आम्ही आणि दिल्लीच्या नागरिकांबरोबर आहेत. भाजपने प्रशासकीय सेवांच्या नियंत्रणासाठी काढलेला वटहुकूम आणि लोकांनी निवडून दिलेल्या आप सरकारवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आहेत. तेही आमच्या लढाईत सामील होतील. केंद्र सरकारविरोधात लढण्यासाठी ते सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत.’’

वटहुकमाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी केंद्राने विधेयक आणले तर ते राज्यसभेत नामंजूर व्हावे म्हणून मी स्वत: सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुखांची व्यक्तिश: भेट घेणार आहे. मी नितीश कुमार यांनाही या संदर्भात सर्व विरोधी पक्षांशी बोलण्याची विनंती केली आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले. आपण मंगळवारी दुपारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही कोलकात्यात भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय घडले?

वरिष्ठ सनदी अधिकारी आणि दिल्ली, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली (नागरी) सेवा (डीएएनआयसीएस) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या आणि त्यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईसाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण’ स्थापन करण्यासाठी शुक्रवारी वटहुकूम जारी केला. तसेच घटनापीठाच्या ११ मेच्या निकालाच्या फेरविचारासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यावरून आप आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा संघर्षांला तोंड फुटले आहे. घटनापीठाने दिल्लीतील आप सरकारकडे पोलीस, सार्वजनिक सुव्यवस्था आणि जमीन यांच्याशी संबंधित सेवा वगळून अन्य सेवांचे नियंत्रण सोपवल्यानंतर एका आठवडय़ातच केंद्राने ही दोन पावले उचलली.

सेवा नियंत्रणाबाबतच्या घटनापीठाच्या निकालानंतर केंद्राने काढलेल्या वटहुकमावरून नितीश कुमार यांनी तीव्र टीका केली. तुम्ही निवडून आलेल्या सरकारची सत्ता कशी काढून घेऊ शकता, असा प्रश्न त्यांनी केला. संविधान पाहा आणि काय बरोबर आहे ते ठरवा. आम्ही पूर्णपणे केजरीवाल यांच्याबरोबर आहोत. जास्तीत जास्त विरोधी पक्ष एकत्र कसे येतील, या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे थांबले पाहिजे, असे नितीश कुमार म्हणाले.

भाजपविरोधात व्यूहरचना

नवी दिल्ली : भाजपविरोधातील संभाव्य महाआघाडीत ‘आप’लाही सहभागी करून घेण्यासाठी रविवारी नितीशकुमार यांनी केजरीवाल यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही दिल्ली सरकारच्या अधिकारांना कात्री लावणारा वटहुकूम केंद्राने काढला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मंजुरीसाठी आणले जाईल. राज्यसभेत भाजपकडे बहुमत नसल्याने ते रोखून धरण्याची व्यूहरचना तयार केली जाणार आहे. त्यासाठी नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला आहे. आता केजरीवाल विरोधकांच्या पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार आहेत.

केजरीवाल यांना पाठिंबा : नितीश कुमार

तुम्ही निवडून आलेल्या सरकारचे अधिकार काढून कसे घेऊ शकता? केजरीवाल दिल्लीत चांगले काम करत आहेत, परंतु त्यांना रोखले जात आहे. त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त)चे प्रमुख नितीश कुमार यांनी सांगितले. जास्तीत जास्त विरोधी पक्ष एकत्र कसे येतील, या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. देशात सौहार्द आणि बंधुता कायम राहावी यासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली जाईल, असेही ते म्हणाले.

सर्वासाठी ‘वेक अप कॉल : मेहबूबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरमध्ये जे घडले ते संपूर्ण देशात घडणार आहे. दिल्ली सरकारचे अधिकार रद्द केले गेले आहेत. प्रत्येकासाठी हा एक ‘वेक अप कॉल’ आहे. देशात हे कोठेही घडू शकते. भाजपला कोणताच विरोधी पक्ष नको आहे, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी बंगळूरुत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

केंद्राकडून न्यायव्यवस्थेचा अपमान : अखिलेश

केंद्राचा अध्यादेश हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. भाजपच्या नकारात्मक राजकारणाचा हा परिणाम आहे. लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागांवर पराभव होणार हे भाजपला माहीत आहे, त्यामुळेच जनतेवर सूड उगवला जात आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली.

Story img Loader