भाजपशी असलेली युती तोडल्यामुळे अल्पमतात आलेल्या नितीशकुमार यांच्या सरकारने बुधवारी विधानसभेत पार पडलेल्या विश्वासदर्शक ठराव अपेक्षेप्रमाणे जिंकला. सर्वात मोठा पक्ष असलेल्या जेडीयूला अपक्षांसह सभागृहातील १२६ सदस्यांनी पाठिंबा दर्शवला तर २४ आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. दरम्यान, भाजपने नितीशकुमार यांचा निषेध करीत विश्वासघाताचा आरोप करीत सभात्याग केला.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रचारप्रमुख नेमल्यामुळे अस्वस्थ झालेल्या जेडीयूने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात सरकारमध्ये असलेल्या भाजपशी काडीमोड घेतल्यामुळे नितीशकुमार सरकार अल्पमतात आले होते. याप्रकरणी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी नितीशकुमार यांना विश्वासदर्शक ठराव आणण्याची सूचना केली होती. मात्र बहुमताचा विश्वास असल्यामुळे नितीशकुमार यांनी राज्यपालांच्या सूचनेनुसार बुधवारी बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला.
विश्वासदर्शक ठरावाच्या दरम्यान, भाजपने नितीशकुमार यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला. तसेच नितीशकुमार विरोधात तर नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणा देत भाजपच्या ९१ आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर पार पडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला काँग्रेस ४,भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ आणि ४ अपक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे नितीशकुमार सरकारपुढील मार्ग मोकळा झाला. पाठींबा देणाऱ्या या आमदारांमुळे जेडीयूला १२६ चा आकडा गाठता आला.

‘कॉपरेरेट लॉबी’ने मोदींची लाट निर्माण केली-नितीश
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबाबत देशभरात ‘कॉपरेरेट लॉबी’ने लाट तयार केली आहे. मात्र ही हवा अल्पकालीन असून कोणतीही जादू करण्यास असमर्थ ठरणार असल्याची टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले .विश्वासदर्शक ठरावाच्या पाश्र्वभूमीवर बोलताना नितीश कुमार म्हणाले की, सध्या देशभरात मोदींच्या नावाचा उदोउदो होत आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पसरले आहे. मात्र देशात मोदी लाट नसून केवळ ‘कॉपरेरेट लॉबी’ने त्यांच्या नावाची हवा निर्माण केली आहे. त्यामुळे मोदी नावाची ही लाट २०१४ च्या निवडणुकीत कोणताही करिष्मा दाखवू शकणार नाही, असे नितीश कुमार म्हणाले.

विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरून भाजपमध्ये असंतोष
विश्वासघात केल्याचा आरोप करीत जेडीयूशी वाद घालणाऱ्या बिहार भाजपमधील अंतर्गत असंतोषही आता समोर आला आहे. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेता निवडताना पक्षाने आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप आमदारांनी केला आहे.
जेडीयूशी काडीमोड घेतल्यानंतर विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेणाऱ्या भाजपच्या संसदीय समितीने नंदकिशोर यादव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. मात्र यादव यांची निवड करताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आक्षेप प्रेम कुमार, चंद्रमोहन राय, गिरिराज सिंग आणि विक्रम कुवर आदी वरिष्ठ आमदारांनी केला आहे. नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात शहरी विकासमंत्री असणाऱ्या प्रेम कुमार यांनी आमदारांना विश्वासात न घेतल्यामुळे संसदीय समितीच्या बैठकीवर आपण बहिष्कार टाकल्याचे स्पष्ट केले, तर इतरही आमदारांनी आपल्याला कोणतीही कल्पना न दिल्यामुळे यादव यांच्या निवडीबद्दल नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, विधान परिषदेच्या नेतेपदी भाजपने माजी उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांची निवड केल्याचे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Story img Loader