रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिल्यापासून रा.लो.आ. आणि भाजपवर विरोधक तुटून पडले आहेत. इतकेच नाही तर दलित उमेदवारांमध्ये स्पर्धा लागावी म्हणून काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्या विरोधी पक्षांकडून माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचे नाव पुढे करण्यात आल्याचे बोलले जाते आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मात्र रामनाथ कोविंद यांच्या नावालाच पसंती दर्शवली आहे. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी शुक्रवारी केला खरा.. मात्र तो सपशेल फसला आहे.
बिहारच्या कन्येला हरवण्यासाठी विरोधकांनी राष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरवले आहे अशी टीका नितीशकुमार यांनी केली आहे. एवढंच नाही तर मीरा कुमार यांना उमेदवारी दिल्याने विरोधी पक्षांवर तिखट शब्दात टीकाही केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला खरा, पण तो फसला आहे. नितीशकुमार यांनी, कोविंद यांना दिलेल्या पाठिंब्याच्या निर्णयावर फेरविचार करावा अशी विनंती लालूप्रसाद यादव यांनी केली होती. ती धुडकावून लावत नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव आणि विरोधकांवर टीकेचे बाण चालवले आहेत. शुक्रवारी लालूप्रसाद यादव यांनी रमजान सुरू असल्याने इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला नितीशकुमार यांनाही बोलावणे होते. या पार्टीतून बाहेर पडल्यावर लगेचच पत्रकारांशी बोलतांना नितीशकुमार यांनी तिखट प्रतिक्रिया देत विरोधकाचा समाचार घेतला आहे.
मीरा कुमार यांनी निवड करायची होती तर त्यासाठी दोनवेळा संधी येऊन गेली. त्यावेळी झोपला होतात? आता तयारी करायची असेल तर ती सच्च्या दिलाने २०१९ ला होणाऱ्या निवडणुकांची करा. मी घेतलेला निर्णय सर्वानुमते घेतला आहे. रामनाथ कोविंद हे एक चांगले राष्ट्रपती होऊ शकतील अशी अपेक्षा वाटल्याने हा त्यांना पाठिंबा दर्शवला आहे असेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे. गेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी प्रणव मुखर्जी आणि हमीद अन्सारी उमेदवार होते, त्यावेळी भाजपच्या काही नेत्यांनी या नावांना विरोध दर्शवला होता. तो विरोध कसा चुकीचा आहे हे मी, त्यावेळी दाखवून दिले होते. त्यामुळे कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला नाही हे आम्हाला चांगले कळते असेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे.