नितीशकुमारांचा नरेंद्र मोदी यांच्याविषयीचा द्वेष आणि पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा यामुळेच संयुक्त जनता दलाने भारतीय जनता पक्षाशी काडीमोड घेतल्याचा आरोप बिहार विधानसभेतील नव्याने निवडलेले विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव यांनी केला. गेल्या सात वर्षांमध्ये पहिल्यांदाच नितीशकुमार यांना विरोधी पक्षाकडून एवढ्या तीव्र स्वरुपाच्या टीकेला सामोरे जावे लागले.
यादव नितीशकुमारांवर हल्ला करताना म्हणाले, खरी गोष्ट ही आहे की तुम्ही मोदींना घाबरलाय. मोदींचा द्वेष करू नका. मोदींनी आतापर्यंत जे नाव कमावलयं, त्यापेक्षा जास्त मोठे होण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही स्वतःच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगत आहात, तर मग मोदींशी स्पर्धा कशाला करता?
बिहारमध्ये २०१० मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या बहुमताचे श्रेय एकटे नितीशकुमार घेऊ शकणार नाहीत. त्यावेळी नितीशकुमार यांना भाजपनेही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. आम्ही केलेल्या प्रयत्नामुळेच बिहारमध्ये पुन्हा सत्ता मिळाली. आता तुमचे काम संपल्यावर आम्हालाच लाथ मारताय. बिहारमधील जनता या विश्वासघाताचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, अशाही इशारा यादवांनी दिला.