देशात २०२४ लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी भाजपासह विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. त्यापार्श्वभूमीवर बिहारमधील पाटणा येथे १२ जून रोजी विरोधकांची बैठक होणार होती. पण, ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक २३ जूनपर्यंत पुढं ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसने उपस्थित राहण्यास नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते, राहुल गांधी विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं.
हेही वाचा : बिहारमध्ये १७०० कोटी रुपयांचा निर्माणधीन पूल पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला, VIDEO आला समोर
विरोधी पक्षांची मूठ बांधण्यासाठी या बैठकीकडे पाहिजे जात होते. अलीकडे नितीश कुमार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली होती. यासह अन्य राज्यांचा दौरा करून केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता.