बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका तांत्रिकाची घेतलेली भेट सध्या गाजत असून त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात नितीश यांच्यावर टीका करण्यासाठी विरोधकांच्या हाती आयतेच हत्यार मिळाले आहे. एकमेकांचे हाडवैरी असणारे नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यंदाच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. सध्या दोन्ही नेत्यांमध्ये मैत्री असली तरी नितीश यांनी लालूंचा गुप्तपणे काटा काढण्यासाठी तांत्रिकाची भेट घेतल्याची टीका विरोधकांनी सुरू केली आहे. या व्हिडिओतील नितीश कुमार आणि तांत्रिकामधील सर्व संभाषण स्पष्टपणे ऐकू येत नसले तरी काही गोष्टींमुळे नितीश कुमार अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्हिडिओत नितीश कुमार आणि तांत्रिक एका खाटेवर बसलेले दिसत आहेत. यावेळी तांत्रिकाने नितीश कुमारांना तुम्ही लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती का केलीत असा प्रश्न विचारला आहे. त्याचप्रमाणे नितीश झिंदाबाद, लालू मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या आहेत. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर भाजप नेते गिरिराज सिंह यांनी लालूंचा काटा काढण्यासाठीच नितीश कुमारांनी तांत्रिकाला भेट घेतल्याचे म्हटले आहे. लालू प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदींवर टीका करताना मला दुष्ट शक्तींना निष्प्रभ करायचे तंत्र माहिती असल्याचे म्हटले होते. मात्र, हे करण्यापूर्वीच लालूंचा लहान भाऊ (नितीश कुमार) त्यांचाच काटा काढण्यासाठी मांत्रिकाकडे पोहचल्याची टीका गिरिराज सिंग यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी, वेळ वाईट असेल तर तंत्र-मंत्र करूनही उपयोग होत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, लालूंना याविषयी विचारले असता आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले. या अशा तांत्रिकांपेक्षा मी मोठा तांत्रिक असल्याचेही लालूंनी यावेळी सांगितले.

Story img Loader