गुजरातमध्ये भाजपला सलग तिसऱ्यांदा विधानसभा जिंकून देणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मोदी यांच्या विजयाबाबत प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना त्यांनी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी कोणतेही ‘खाद्य’ पुरविले नाही. प्रदेश भाजपने नितीश यांच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत महत्त्वाचा घटक पक्ष असणाऱ्या जनता दल युनायटेडचे नितीशकुमार हे पहिल्या फळीतील नेते आहेत. मात्र भाजप हा मित्रपक्ष असूनही मोदी आणि त्यांच्यात फारसे सख्य नाही. गोध्रा जळीतकांडानंतर २००२मध्ये गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीस ते मोदी यांना जबाबदार मानतात. या पाश्र्वभूमीवर, मोदी यांच्या विजयाबाबत त्यांची प्रतिक्रिया काय असेल, याची उत्सुकता असणाऱ्या पत्रकारांच्या पदरी निराशाच आली. गुजरात विधानसभेचे निकाल गुरुवारी दुपापर्यंत स्पष्ट झाल्यानंतर पत्रकारांनी गाठले असता त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. शुक्रवारीही एका सरकारी कार्यक्रमादरम्यान त्यांना पत्रकारांच्या याच प्रश्नांना तोंड द्यावे लागले. या विषयावर बोलण्यासाठी मी तुमच्याशी खास संपर्क साधेन, असे मोघम उत्तर देऊन त्यांनी हे प्रश्न टाळले.
नितीश यांच्या या पवित्र्याबाबत प्रदेश भाजपचे अध्यक्ष सी. पी. ठाकूर यांनी आश्चर्य व्यक्त केले. मोदी यांचे या विजयाबद्दल अभिनंदन का केले नाही, याचा नितीशना खुलासा करावा लागेल. सार्वजनिक जीवनात एखाद्याच्या यशाबद्दल आपण त्याचे औपचारिक अभिनंदन करण्यात काहीच गैर नाही, असे ते म्हणाले. निधर्मी विचारसरणीच्याच नेत्याला भाजपने पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावी, अशी सूचना नितीश यांनी काही महिन्यांपूर्वी मोदी यांचे नाव न घेता केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा