नरेंद्र मोदींचे पंतप्रधानपदाचे स्वप्न कधीही साकार होणार नाही, अशी घणाघाती टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. पाटण्यातील सभेत मोदींनी नितीशकुमारांना लक्ष्य केले होते. त्याला उत्तर देत नितीशकुमारांनी मोदींची तुलना हिटलरशी केली. संयुक्त जनता दलाच्या पदाधिकारी मेळाव्यात नितीशकुमारांनी मोदींच्या पाटणा येथील सभेत केलेल्या टीकेतील प्रत्येक मुद्दय़ाला उत्तर दिले.
जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया यांच्या  पाठीत खंजीर खुपसल्याचा मोदींचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. लोहियांनी काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी बिगर काँग्रेस पक्षांना एकत्र आणले, पण भाजपचीच भूमिका एकला चलोरे आहे. काँग्रेसच्या विरोधातील लढा भाजपनेच कमकुवत केल्याचा आरोप त्यांनी केला. जे.पी. आणि लोहियांच्या विचारांशी आपण कधीही प्रतारणा केली नसल्याचा दावा त्यांनी केला. जनता दलासमवेत १७ वर्षांची युती तुटण्यास भाजपच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसला हटवायचे आणि त्याचे श्रेय आपण घ्यायचे ऐवढेच भाजपचे उद्दिष्ट होते असा आरोप केला.
‘मोदी खोटारडे’
एखादी गोष्ट खरी वाटावी म्हणून मोदी खोटी गोष्ट शंभर वेळा उच्चारतात असा आरोप नितीशकुमारांनी करत त्यांची तुलना हिटलरशी केली. देशभरात मोदींची लाट असल्याचा जो प्रचार केला जात आहे त्याच षड्यंत्राचा हा भाग असल्याची टीका नितीशकुमारांनी केली. पंतप्रधानांसोबत टेबलावरील भोजनाचा मुद्दाही चुकीचा असल्याचा दावा नितीशकुमारांनी केला. तसेच मोदींनी गुजरातमध्ये आपला कधी पाहुणचार केला? आपण सरन्यायाधीशांच्या समारंभाला उपस्थित होतो त्या वेळी मोदीही होते. अशा प्रचाराने विजय मिळणार नाही. ज्या व्यक्तीला सर्वोच्च पद भूषवायचे आहे त्याने सर्वाना बरोबर घेऊन गेले पाहिजे आणि  भाषेत गोडवा आणून उतावळेपणा टाळायला हवा असा सल्ला मोदींना दिला.
‘मीही सामान्य कुटुंबातला’
मोदी सभांमध्ये सातत्याने आपले बालपण गरिबीत गेल्याचे सांगत आहेत. रेल्वे स्टेशनवर चहा विकून इथपर्यंत आल्याचे मोदी वारंवार प्रचार करत आहेत. मात्र आपलीही पाश्र्वभूमी सामान्य कुटुंबातील आहे, याचे कधी भांडवल केले नाही. आपल्याला रेल्वेत चहा विकण्याचा अनुभव नाही असे सांगत मोदींना टोला लगावला.
तिसऱ्या आघाडीचा प्रयोग नाही
काँग्रेसशी चर्चा करण्याचा किंवा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्याचा आपला विचार नसल्याचे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. बुधवारी होणाऱ्या बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप पक्षांनी आयोजित केलेल्या जातीयताविरोधी सभेला हजर राहणार आहोत, मात्र त्याचा तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीशी काही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला.