Narayan Rane quote on Refinery Project : राजापुरातील प्रस्तावित बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात घमासान सुरू आहे. राजकीय समर्थक आणि विरोधक आमने सामने आले आहेत. बारसूची जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच सुचवली होती, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता. तर, त्याला प्रत्युत्तर म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं आत्मचरित्रच भर पत्रकार परिषदेत ठाकरे गटाने वाचून दाखवलं आहे. कारण, या आत्मचरित्रात नारायण राणे यांनी कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला कडवा विरोध दर्शवला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी बारसू येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. तसंच, कातळशिल्प येथेही भेट दिली. त्यानंतर, त्यांनी आता पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचं आत्मचरित्र वाचून दाखवलं. ज्यात नारायण राणे यांनी कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला होता.

हेही वाचा >> “त्या’ एका पत्राची किंमत १०० कोटी…”, बारसू रिफायनरीवरून नितेश राणेंचा ठाकरेंवर पुन्हा आरोप; म्हणाले, “मातोश्रीवर खोके…”

विनायक राऊत म्हणाले की, “नारायण राणेंनी याच आत्मचरित्रामध्ये रिफायनरी प्रकल्पाविरोधात जी वाक्य लिहिली होती ती वाचून दाखवतो. मागच्या चार वर्षातील हे आत्मचरित्र आहे. माझा राजकीय पाठिंबा कोणालाही असो. पण रिफायनरी प्रकल्पाचा मी कडवा विरोधक आहे, कडवा विरोधक राहणारच आहे, असं नारायण राणेंनी लिहिलं आहे.”

विनायक राऊत आत्मचरित्रातील हा उतारा वाचत असतानाच उद्धव ठाकरेंनी मध्येच त्यांना अडवत, “नारायण राणेंनी कदाचित आत्मचरित्र नाही तर आत्मा विकला असावा”, असा मिश्किल टोलाही लगावला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हेही वाचा >> बारसू रिफायनरी प्रकल्पावरून भास्कर जाधव अखेर बोलले; म्हणाले, “थेट १ लाख नोकऱ्या…”

“हा विनाशकारी प्रकल्प झाला तर, सहा हजार हेक्टर म्हणजे १५ हजार एकर जमीन जाणार आहे. आंब्याची किमान १५ ते २० लाख झाडे तोडली जाणार आहेत. ७ ते १० लाख काजूची झाडं जाणार. ७०० हेक्टर जमिनीवरील शेती नष्ट होणार आहे. २५ हजार लोक विस्तापित होणार आहेत, असं नारायण राणेंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं आहे, असं विनायक राऊत म्हणाले. “आता त्याच रिफायनरीसाठी दलाली करण्याची सुरुवात होत असताना ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त समर्थकांचा मोर्चा लावण्याचं काम राणेंनी केलं आहे”, असंही राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No autobiography but the soul will be sold uddhav thackerays group while reading the autobiography of narayan rane sgk