जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वानिमित्त सरकारने मांसविक्रीवर घातलेल्या बंदीला उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. या प्रकरणी अद्याप उच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिलेला नाही. त्यामुळे आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि न्या. कुरिअन जोसेफ यांच्या खंडपीठाने या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. एका जैन संघटनेने उच्च न्यायालयाच्या स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सरकारने घातलेल्या बंदीला स्थगिती देताना उच्च न्यायालयाने पूरक कारणे दिली आहेत. त्याचबरोबर अजून याबाबत अंतिम निकाल येणे बाकी आहे. त्यामुळे आम्ही यावर सुनावणी घेऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये, यावर सरकारने बंधन घालणे अनुचित असल्याचे स्पष्ट करीत गेल्या सोमवारी उच्च न्यायालयाने मांसविक्री बंदीला स्थगिती दिली होती.

Story img Loader