Gautam Adani bribery Case : अमेरिकेत गौतम अदाणी यांच्यावर करण्यात आलेले आरोप अदाणी समूहाने फेटाळून लावले आहेत. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने (AGEL)ने यासंबंधी निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये गौतम अदाणी, सागर अदाणी आणि वरिष्ठ अधिकारी विनीत जैन यांच्यावर यूएस फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA)चे उल्लंघन केल्याचा आरोप नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच असा दावा करणारे वृत्त खोटे असल्याचेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.
अदाणी ग्रीन एनर्जी कंपनीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात मिडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेला दावा फेटाळून लावला आहे. या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, अमेरिकेच्या न्याय विभागाने आणि ‘यूएस सेक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’ (SEC)ने केलेल्या आरोपांमध्ये गौतम अदाणी, सागर अदाणी आणि विनीत जैन यांच्याविरोधात लाचखोरीचे किंवा भ्रष्टाचाराचे आरोपांचा समावेश नाही.
एजीइएलने त्यांच्या निवेदनात संचालकांची नावे कोणत्या प्रकरणात आहेत याबद्दल माहिती दिली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या गुन्हेगारी आरोपात गौतम अदाणी, सागर अदाणी आणि विनीत जैन यांची नावे तीन प्रकरणे आहेत. ज्यामध्ये कथित सेक्युरिटीज फ्रॉडसंबंधी कट रचणे, कथित वायर फ्रॉडसंबंधी कट रचणे आणि कथित रेक्युरिटीज फ्रॉड या प्रकरणांचा समावेश आहे.
तसेच कंपनीने या कोणत्याही प्रकरणाचा एफसीएपीए उलंघनाशी संबंध नाही असेही म्हटले आहे. तसेच एजीइएलने माध्यमांमध्ये देण्यात आलेले यासंबंधीच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि कंपनीने चुकीची माहिती पसरू नये यासाठी स्पष्टीकरण देणे आवश्यक होते असेही म्हटले आहे. गौतम अदाणी यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा अदाणी समूहावर परिणाम होऊ शकतो असे बोलले जात आहे. यादरम्यान एजीइएलने स्पष्टीकरण देत आरोपांबाबत खुलासा केला आहे.
मुकुल रोहतगी काय म्हणाले?
यादरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बुधवारी स्पष्ट केले की, लाच दिल्याच्या प्रकरणात अमेरिकेच्या वकिलांनी दाखल केलेल्या आरोपांनंतर गौतम अदाणी आणि त्यांचा पुतण्या यांच्याविरोधात यूएस फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA)चे उलंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. रोहतगी म्हणाले की, “अदाणी यांनी भारतीय अधिकार्यांना सौर ऊर्जा प्रकल्पासाठी लाच दिल्याचे म्हटले आहे, मात्र कोणत्या पद्धतीने लाच दिली याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही”.
“या प्रकरणात पाच आरोप ठेवण्यात आले आहेत. पहिला आणि पाचवा आरोप हे इतर आरोपांपेक्षा महत्त्वाचे आहेत. गौतम अदाणी आणि त्यांचा पुतण्या यांच्यावर एफएपीए (पहिला आरोप) अंतर्गत गुन्हा दाखल नाही. जो भारतातील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे आहे. तसेच त्यांच्यावर न्यायात अडथळा आणल्याप्रकरणीही (पाचवा आरोप) गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यामध्ये काही परदेशी नागरिकांची नावे आहेत”, असेही रोहतगी यांनी स्पष्ट केले.