पाकिस्तानच्या ताब्यात ६० तास घालवल्यानंतर पुन्हा सन्मानाने भारतात परतलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूला जखम झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, त्याच्या शरीरात बाहेरील कोणतीही कृत्रीम वस्तू आढळून आलेली नाही. दिल्लीतील लष्कराच्या रिसर्च आणि रेफरल हॉस्पिटलमध्ये झालेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये ही बाब समोर आली आहे.


एएनआयच्या माहितीनुसार, अभिनंदन यांच्या एमआरआय स्कॅनमध्ये मारहाणीचे घाव मिळालेले नाहीत. मात्र, पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूला जखम झालेली आहे. असं सांगितलं जात आहे की, त्यांचे मिग २१ विमान कोसळल्यानंतर पॅराशूटने खाली उतरताना ते जमिनीवर आदळल्याने त्यांच्या मणक्याला जखम झाली असावी. दरम्यान, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी अभिनंदन यांची रुग्णालयात भेट घेतली.

सुत्रांच्या माहितीनुसार, पॅराशूटने खाली उतरल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. यावेळी त्यांच्या मांडीला दुखापत झाली होती. दरम्यान, रुग्णालयात त्यांच्या आणखी काही चाचण्या आणि उपचार होणार आहेत. पीओकेत उतरल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना मारहाण केली होती.

पायलट अभिनंदन यांनी मिग-२१ विमानाद्वारे पाकिस्तानचे अत्याधुनिक फायटर जेट एफ-१६ पाडले होते. मात्र, त्यानंतर त्यांचे विमानही पाकिस्तानच्या विमानाच्या निशाण्यावर आले होते. त्यांना पॅराशूटच्या माध्यमांतून खाली उतरावे लागले होते. ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले होते. तिथे पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले होते.

Story img Loader