संभाव्य कर्जचुकवेगिरीला आळा घालण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून सहा लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना यापुढे वाहन खरेदीसाठी कर्ज न देण्याचा निर्णय भारतीय स्टेट बँकेने घेतला आहे. याखेरीज या कर्जास पात्र होण्यासाठीचे निकषही बँकेने अधिक कडक केले आहेत.
याआधी अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असले तरी वेतनधारकांना बँकेकडून वाहन कर्ज उपलब्ध होत होते. ही मर्यादा आता थेट सहा लाखांपर्यंत वाढविण्यात आल्याचे बँकेच्या अलीकडच्या परिपत्रकावरून स्पष्ट झाले आहे.
ज्या व्यक्तींचे स्टेट बँकेत खाते असेल, त्यांच्यासाठी ही मर्यादा साडेचार लाखांपर्यंत असेल. सध्या कार खरेदीसाठी बँकेकडून १०.४५ टक्के दराने कर्ज देण्यात येते. कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेवर सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम होत असून त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत बँकेकडून देण्यात येणाऱ्या वाहन कर्जाच्या वाटय़ात मागील वर्षांपेक्षा ३८.७१ टक्के वाढ झाली. या कालावधीत २६ हजार ४११ कोटी रुपयांच्या वाहन कर्जाचे वाटप करण्यात आले. मागील वर्षी याच कालावधीत १९ हजार ४० कोटी रुपयांचे वाहन कर्ज देण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा