देशामध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याचा कोणताही निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन नसून, याबाबत निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य राज्यांना देण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी रायपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच स्थानिकांच्या भावनांचा विचार करुनच राज्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
अलीकडेच केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी गोमांस खायचे असले, तर पाकिस्तानात चालते व्हा, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. यावर मंत्रिमंडळातील त्यांचेच सहकारी केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी मी गोमांस खातो आणि ते खाण्यापासून मला कोणी रोखू शकते का, असे प्रत्युत्तर दिले होते. या पार्श्वभूमीवर व्यंकया नायडू यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
दरम्यान ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार असेल तेथे गोवंश हत्याबंदीचा निर्णय लागू करण्यात येईल, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गोवा येथे केल्याचे वृत्त पीटीआयने प्रसिद्ध केले. तसेच नक्वींचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असून, त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader