दिल्ली क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी दिल्ली सरकारने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीच्या अहवालात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना ‘क्लीन चिट’ देण्यात आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा जेटली यांच्यावर टीका केली. केजरीवाल यांनी आता माफी मागावी, अशी मागणी भाजपचे नेते करीत होते. त्याला केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्याला उत्तर दिले. आपण माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर बदनामीच्या खटल्यात उलट तपासणी घेण्यात येऊ दे आणि सत्य बाहेर येऊ दे, असे केजरीवाल यांनी ट्विटरवर लिहिले आहे.
डीडीसीए प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीने कोणालाही क्लीन चीट दिलेली नाही. केवळ डीडीसीएच्या कारभारात गैरव्यवहार झाले आहेत, यावर शिक्कामोर्तब केलेले आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. चौकशी समितीने गैरव्यवहारांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आयोग नेमण्याची शिफारस केली आहे. आयोग तपास करून गैरव्यवहारांची जबाबदारी निश्चित करेल, याकडे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून लक्ष वेधले.
मागील महिन्यात दिल्ली सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या चौकशी समितीचे प्रमुख दिल्लीच्या दक्षता विभागाचे प्रधान सचिव चेतन सांघी होते. हीच फाईल ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आपल्या कार्यालयावर छापा घातल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. या कथित भ्रष्टाचारामागे जेटली असल्यामुळे त्यांना वाचविण्यासाठीच छाप्याचा घाट घालण्यात आल्याचे आप नेते वारंवार सांगत होते; परंतु या अहवालात जेटली यांच्या नावाचा दूरान्वयानेही निर्देश करण्यात आलेला नाही; तथापि या २३७ पानी अहवालात संघटनेतील कथित भ्रष्टाचाराबाबत केवळ काही निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत, ज्यात संघटनेच्या आर्थिक निधीतील कथित गैरव्यवहार, संबंधितांची परवानगी न घेता फिरोजशा कोटला मैदानात कॉर्पोरेट बॉक्सेसची उभारणी, खेळाडूंनी वय प्रमाणपत्रात केलेला घोळ आदी मुद्दय़ांचा समावेश आहे.