आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध ऊठसूट कुणीही बोलू नये, असे निर्देश अ. भा. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्याचे समजते. मोदींबद्दल काँग्रेसच्या ठरावीक प्रवक्त्यांनीच टीकाटिप्पणी करावी. मोदींवर वैयक्तिक हल्ले करण्याऐवजी गुजरातच्या विकासाच्या मॉडेलला लक्ष्य करावे, अशी सूचना राहुल गांधींनी आपल्या पक्षप्रवक्त्यांना दिल्याचे समजते.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या मोदींवर काँग्रेसचे लहानमोठे नेते टीका करायला आतुर असतात, पण त्यांच्या अनावश्यक टीकेमुळे पक्ष आणि केंद्रातील सरकार अनेकदा अडचणीत येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता राहुल गांधींनी आपल्या नेत्यांच्या वाणीला लगाम लावण्यासाठी पुढाकार घेतल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेसचे काही नेते मोदींवर भान विसरून वैयक्तिक टीका करीत असल्यामुळे त्यांना अकारण प्रसिद्धी मिळते, असेही राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
वृत्तवाहिन्यांवर झडणाऱ्या वाद-चर्चामध्ये भाग घेण्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी पूर्वपरवानगी घ्यावी आणि पक्षाच्या धोरणाशी विसंगत बोलणाऱ्या नेत्यांची अंतर्गत चौकशी करण्यात येईल, अशीही तंबी राहुल गांधींनी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दहा दिवसांपूर्वीच दिल्लीत जवाहर भवन येथे राहुल गांधी यांनी देशभरातील निवडक पक्षप्रवक्त्यांना संबोधित केले होते, पण त्यातून बोध घेण्याऐवजी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार राज बब्बर यांनी १२ रुपयांत भरपेट भोजन मिळत असल्याचा दावा करीत काँग्रेसला अडचणीत आणले होते.

Story img Loader