लडाख भागात चीनने घुसखोरी केल्यानंतर निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी कुठलीही तडजोड करण्यात आलेली नाही असे स्पष्टीकरण उत्तर कमांडचे कमांडिंग इन चिफ के. टी. पारनाईक यांनी केले.
त्यांनी वार्ताहरांना सांगितले की, चीनच्या सैन्याने १५ एप्रिल पूर्वी ते जेथे होते त्या जागी जावे या अटीवर हा तोडगा काढण्यात आला व त्यात काहीही तडजोड करण्यात आली नाही. आम्ही त्यांच्या कुठल्याही अवाजवी मागण्या मान्य केल्या नाहीत. कुठलीही बांधकामे पाडली नाहीत.
चीनबरोबरच्या वादात कुठलीही सार्वजनिक विधाने करायची नाहीत असे आम्ही हेतुपुरस्सर ठरवले होते. सरकारने व परराष्ट्र कार्यालयाने लोकांना याबाबत माहिती देण्याची जबाबदारी घेतली होती, असे ते म्हणाले.
लडाख भागातील दौलत ओल्ड बेगी विभागात १५ एप्रिलला चिनी सैन्याने तंबू टाकून शिष्टाचाराचे उल्लंघन केले होते, १५ एप्रिलला चिनी सैन्य त्या भागात आले व तंबू टाकले. नंतर ते तेथेच ठिय्या मांडून बसले, हे शिष्टाचाराचे उल्लंघन होते. हे प्रकरण नंतर परराष्ट्र कार्यालयाकडे गेले व आमच्या अनेक बैठका झाल्या, परराष्ट्र कार्यालय हे चीनच्या संपर्कात होते. कुठल्याही तडजोडीशिवाय परिस्थिती सुरळीत करण्यात यश आले, असे त्यांनी स्पष्ट केले.चीनबरोबरच्या पेचप्रसंगात तडजोड केलेली नाही, त्यात आपण काही गमावलेले नाही. आपली संरक्षण बांधकामे पाडलेली नाहीत. भारताची चीनबरोबरच्या लडाख भागातील सीमेबाबत अनेक समस्या आहेत कारण त्याचे आरेखन व्यवस्थित केलेले नाही. दोन्ही देशांचे सीमेबाबतचे आकलन वेगळे आहे.
लष्करी दले खास अधिकार कायदा अंशत: मागे घेण्यास आपला विरोध असल्याचे सांगून ते म्हणाले की, लष्कराने या कायद्याचा दुरूपयोग केलेला नाही. त्यामुळे हा कायदा मागे घेण्याची गरज नाही.
अमरनाथ यात्रेबाबत विचारले असता ते म्हणाले की, अमरनाथ यात्रेला धोका असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.