पीटीआय, नवी दिल्ली : ध्रुवीकरण, सांप्रदायिकता आणि भगवेकरण यांच्यावर आता भारत सोडण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर हल्ला केला. तसेच संसदेत पंतप्रधानांनी उपस्थित राहावे यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्याशिवाय ‘इंडिया आघाडी’कडे पर्याय नव्हता, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.
‘भारत छोडो’ आंदोलनाच्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपने घराणेशाही, भ्रष्टाचार आणि अनुनयाच्या राजकारणापासून भारताला मुक्त करण्याची घोषणा करीत काँग्रेसला लक्ष्य केले होते. त्या हल्ल्याला चौधरी यांनी गुरुवारी अविश्वास प्रस्तावावरील भाषणात उत्तर दिले. ते म्हणाले, की मला नरेंद्र मोदी १०० वेळा पंतप्रधान बनतील याची चिंता वाटत नाही, तर या देशातील लोकांची काळजी वाटते.
‘मणिपूरमध्ये गृहयुद्ध’
मणिपूरमधील हिंसाचार लहान मुद्दा नाही. हे राज्य वांशिक हिंसाचार आणि गृहयुद्धाला तोंड देत आहे. युरोपीय संसदेत तसेच अमेरिकेतही मणिपूरच्या हिंसाचारावर चर्चा झाली आहे. मणिपूरचा प्रश्न राज्यापुरता मर्यादित नाही..आणि म्हणूनच पंतप्रधानांचा हस्तक्षेप अपरिहार्य आहे. मणिपूरच्या प्रश्नावर लोकसभेत पंतप्रधानांनी उपस्थित राहून बोलावे यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्याशिवाय ‘इंडिया आघाडी’कडे पर्याय नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘ध्रुवीकरण..क्विट इंडिया’
म. गांधी यांच्या १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचे स्मरण करून चौधरी म्हणाले, की त्या वेळी ‘भारत छोडो’ अशी घोषणा देण्यात आली होती, परंतु आता सांप्रदायिकता, ध्रुवीकरण आणि भगवीकरण यांनी देश सोडला पाहिजे.
मणिपूरचे खासदार डॉ. राजकुमार यांना संधी का दिली नाही ?
नवी दिल्ली : राज्यमंत्री आणि मणिपूरमधील भाजपचे खासदार डॉ. राजकुमार रंजन सिंह यांना, लोकसभेत भाषणाची संधी सत्ताधारी पक्षाने का दिली नाही, असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी केला. रमेश म्हणाले, हिंसाचारात ज्यांचे निवासस्थान जाळण्यात आले, त्यांना भाजपने मणिपूरबाबत संसदेत बोलण्याची संधी का दिली नाही?
विकसित देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सकारात्मक – सीतारामन
नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्था धडपडत असताना भारत मात्र आपल्या आर्थिक भविष्याबद्दल आशावादी आणि सकारात्मक स्थितीत आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी लोकसभेत केले. मोदी सरकारने आश्वासने पूर्ण करून प्रशासनाचा कायापालट केल्याचा दावाही त्यांनी केला. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर बोलताना सीतारामन म्हणाल्या, ‘‘अमेरिका, ब्रिटन आणि युरोपसारख्या विकसित देशांसाठी सध्याचा काळ आव्हानात्मक आहे, तर चीनसारख्या मोठय़ा अर्थव्यवस्थाही त्यांच्या ग्राहक मागणी आणि वेतन कुंठितता आदी अंतर्गत समस्यांना तोंड देत आहेत.’’ भारताला ‘नाजूक अर्थव्यवस्था’ म्हणणाऱ्या मॉर्गन स्टॅन्लेंचे भारताबाबतचे निरीक्षण फक्त नऊ वर्षांत मोदी सरकारच्या धोरणांमुळे बदलले आहे, असा दावा सीतारामन यांनी यावेळी केला.
‘मिळेल’च्या जागी ‘मिळाले’
इंदिरा गांधी यांच्या तत्कालीन काँग्रेस सरकारच्या ‘गरीबी हटाओ’ घोषणेवर त्यांनी टीका केली. त्यांनी खरोखरच गरिबी हटवली का, असा सवाल करीत सीतारामन म्हणाल्या, की पंतप्रधान मोदींनी पूर्णपणे परिस्थिती बदलली आहे. ‘मिळेल’ या शब्दाची जागा ‘मिळाले’ या शब्दाने घेतली आहे, असा सीतारामन यांनी केला.
काँग्रेसची अमित शहा यांच्याविरोधात हक्कभंग नोटीस
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी भाषणादरम्यान महाराष्ट्रातील कलावती बांदुरकर यांच्याविषयी असत्यकथन करून संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप करत काँग्रेसने गुरुवारी त्यांच्याविरोधात सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हक्कभंगाची नोटीस दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २००८ मध्ये यवतमाळमधील शेतकरी विधवा कलावती बांदुरकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे नाव चर्चेत आले होते. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, कलावती यांना मोदी सरकारने घर दिले आणि विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला असा दावा शहा यांनी केला होता. मात्र, ते खोटे बोलत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.