भारताला आज एक मजबूत सरकार आणि विश्वासार्ह चेहऱ्याची आवश्यकता आहे, पण दुर्दैवाने संपूर्ण देशाला विश्वास वाटावा असा चेहरा कुठेही दिसत नाही, असे सूचक भाष्य आज येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ‘असोचॅम’ या उद्योजक संघटनेच्या ९२ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात बोलताना केले. देशाचे नेतृत्व करण्यास भाजपप्रणीत रालोआचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांचा चेहरा ‘विश्वासार्ह’ नाही, असा त्यांच्या या विधानाचा अर्थ लावला जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात येणारे सरकार आमचेच असेल आणि ते सध्याच्या सरकारपेक्षा अनेक पटींनी चांगले असेल, अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली. लवकरच दिल्ली-मुंबई कॉरिडॉर बनेल, असे पंतप्रधान मनमोहन सिंग याच कार्यक्रमात सकाळच्या सत्रात बोलताना म्हणाले होते. त्याचाच उल्लेख करीत, तुम्ही हा कॉरिडॉर बनवा, तो आमच्यासाठीच असेल. दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी आम्ही या कॉरिडॉरचाच वापर करू, असे ठाकरे म्हणाले. केंद्रातील मनमोहन सिंग सरकार प्रीपेड कार्डासारखे काम करीत आहे. आधी पैसे भरा, नंतर बोला. पैसे भरल्यानंतरही तुम्ही नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे ऐकविले जाते, असा किस्सा नमूद करून ते म्हणाले की, असे प्रीपेड कार्ड आमच्या सरकारमध्ये नसेल. उलट सारे लोक आमच्या नेटवर्कमध्ये असतील.
‘अ‍ॅसोचॅम’च्या व्यासपीठावर आपले विचार व्यक्त करणारे उद्धव ठाकरे आज दिल्लीत दिवसभर चर्चेत राहिले. विज्ञान भवनातील या कार्यक्रमादरम्यान त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेतली. दुपारी ते भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांना ३०, पृथ्वीराज रोड येथील निवासस्थानी भेटले आणि नंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भेटीसाठी त्यांच्या ६, कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी गेले. सायंकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ११, फिरोजशाह रोड या निवासस्थानी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस वरुण गांधी आणि उपाध्यक्ष एस. एस. अहलुवालिया यांच्याशी चर्चा केली.
देशाचे नेतृत्व करण्यास योग्य विश्वासार्ह चेहरा दिसत नसल्याच्या उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला शिवसेनेचे समर्थन नाही, असा अर्थ लावला जात आहे. केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली रालोआचे सरकार आणण्यासाठी मोदींचा चेहरा पुरेसा विश्वासार्ह नसल्याचा तसेच कुठल्याही चेहऱ्यावर निवडणूक लढण्यापेक्षा बहुमतासाठी लागणारे संख्याबळ संपादन करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
अडवाणी यांच्यासोबत बंद दाराच्या बैठकीतही उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या उमेदवारीविषयी फारसा उत्साह दाखविला नसल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात येणारे सरकार आमचेच असेल आणि ते सध्याच्या सरकारपेक्षा अनेक पटींनी चांगले असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  लवकरच दिल्ली-मुंबई कॉरिडॉर बनेल, असे पंतप्रधान मनमोहन सिंग याच कार्यक्रमात सकाळच्या सत्रात बोलताना म्हणाले होते. त्याचाच उल्लेख करीत, तुम्ही हा कॉरिडॉर बनवा, तो आमच्यासाठीच असेल. दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी आम्ही त्याचा वापर करू, असा टोलाही ठाकरे यांनी पंतप्रधानांना मारला.