पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीत सभा घेतली. मात्र यावेळी अपेक्षा होती त्यापेक्षाही कमी लोकांची उपस्थिती पहायला मिळाली. परिस्थिती अशी होती की, कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या अर्ध्याहून जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या. योगी आदित्यनाथ भाषणासाठी उभे असतानाही परिस्थिती अशीच होती. कदाचित यामुळेच नरेंद्र मोदींची सभा एक तास उशिराने सुरु करण्यात आली. भाजपा मात्र नरेंद्र मोदी सभेला संबोधित करत असताना लोकांची गर्दी होती असा दावा करत आहे.

पंतप्रधान झाल्यानंतर हा मोदींचा पहिलाच रायबरेली दौरा होता. यासाठी भाजपा नेत्यांनी आणि खासकरुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही महत्त्वाचे आदेश दिले होते. आदेशाचं पालन करत भाजपा कार्यकर्त्यांनीही दिवस रात्र काम करत मेहनत घेतली होती. मात्र सभेला हवी तितकी गर्दी ते जमवू शकले नाहीत.

सभेला संबोधित करण्याआधी नरेंद्र मोदींनी मॉडर्न रेल्वे कोच फॅक्ट्रीत गेले, तिथे त्यांनी फॅक्ट्रीत तयार करण्यात आलेल्या 900 व्या डब्याला हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय त्यांनी अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं.

भाजपाकडून रायबरेली नरेंद्र मोदींची सभा आयोजित करणं लोकसभा निवडणुकीची तयारी असल्याचं मानलं जात आहे. यासाठीच भाजपा नेत्यांनी पुरेपूर तयारी केली होती. स्वत: योगी आदित्यनाथ संपूर्ण तयारीवर लक्ष ठेवून होते. ही सभा यशस्वी व्हावी यासाठी संपूर्ण प्रशासनाला कामाला लावण्यात आलं होतं. व्हिडीओमध्ये कार्यक्रमस्थळी अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचं दिसत आहे. काँग्रेस नेत्यांच्या सभेला असते तितकी गर्दीही सभेला दिसत ऩसल्याचं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं आहे.

या सभेत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘आज देशात सर्वांसमोर दोन पक्ष आहेत. एक पक्ष सरकारचा जो आपल्या लष्कराचं बळ वाढावं यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. तर दुसरा पक्ष आहे जो कोणतीही किंमत मोजून देशाला दुबळं करण्यास तयार आहे. देश पाहत आहे काँग्रेस अशा गोष्टींना साथ देत आहे ज्या गोष्टी आपल्या लष्कराला दुबळं करण्याची इच्छा बाळगतात. अशा लोकांसाठी देशाच्या संरक्षणमंत्री खोट्या, भारतीय हवाई दलाचे अधिकारी खोटे, फ्रान्सचं सरकार खोटं आणि आता तर सर्वोच्च न्यायालयही खोटं वाटू लागलं आहे’.