उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज ( २४ एप्रिल ) प्रचारसभेत बोलताना पूर्वीच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. २०१७ पूर्वीच्या सरकारांना दंगली घडवण्यातून वेळ मिळत नव्हता. पण, आज उत्तर प्रदेशात कुठेही संचारबंदी लावली जात नाही, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. ते सहारनपुर येथे एका प्रचार सभेत बोलत होते.
“आता दंगली आणि गुंडगिरी नाहीतर उत्सव आणि महोत्सव ही उत्तर प्रदेशची ओळख आहे. ‘आज यूपी में न कर्फ्यू न दंगा, आज यूपी में सब ओर चंगा’ ( उत्तर प्रदेशात न संचारबंदी न दंगली, सगळीकडे परिस्थिती ठीक आहे )”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
हेही वाचा : VIDEO : नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाल्या…
“उत्तर प्रदेशात आता कावड यात्रा काढण्यात येत आहेत. यापूर्वी तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत होते. आधी मुली घराबाहेर पडायला घाबरत होत्या. पण, आता उत्तर प्रदेशात भयमुक्त वातावरण आहे,” असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.
हेही वाचा : महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण: बृजभूषण सिंहविरोधात आंदोलनकर्त्या खेळाडूंची सुप्रीम कोर्टात धाव
“आपल्याला २०१७ पूर्वीची जातीयवादी सरकार हवे आहेत, की गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारं सरकार हवे आहे. तरुणांच्या हातात बंदुका पाहिजे की, टॅबलेट आणि स्मार्टफोन हे आपण ठरवायचं आहे. रस्त्यावर गुंडांच्या गोळ्यांचा आवाज पाहिजे की, भजनांचा आवाज?,” असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे.