नवी दिल्ली : अमेरिकेच्या वस्तूंवरील आयातशुल्क कपातीसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही, यासंबंधी दोन्ही देशांमध्ये चर्चा केली जात आहे, असे स्पष्टीकरण वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी संसदेच्या परराष्ट्र विषयक स्थायी समितीच्या बैठकीमध्ये दिले. अमेरिकी वस्तूंवरील आयातशुल्कात कपात करण्याची मागणी भारताने मान्य केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच केला होता. त्यानंतर सरकारने खुलासा करण्याची मागणी विरोधकांनी केली होती.

दोन्ही देशांतील व्यापारी व वाणिज्य संबंध दृढ करण्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. ते अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच ट्रम्प यांनी भारतावर आगपाखड केली होती. अमेरिकेच्या वस्तूंवर भारत अनावश्यक आयातशुलक लादत असून भारताच्या वस्तूंवरही मोठे आयातशुल्क लागू केला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. ट्रम्प यांनी भारताने आयातशुल्क कमी करण्याचे मान्य केल्याचा दावा केल्यामुळे अमेरिका व भारत यांच्या व्यापारी सामंजस्याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. या मुद्द्यावर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी असे विरोधकांचे म्हणणे होते. त्यामुळे संसदेच्या परराष्ट्र विषयक स्थायी समितीने सोमवारी वाणिज्य सचिवांना पाचारण केले होते.

अमेरिकेचे आयात शुल्क कमी करण्याची अट भारताने मान्य केलेली नाही. या संदर्भात कोणतेही सामंजस्य झालेले नाही. भारत मुक्त व्यापाराला पाठिंबा देतो व जागतिकीकरणाचे धोरण राबवतो. त्यामुळे दोन्हो देशांना लाभदायी होईल असेच व्यापारी धोरण राबवले पाहिजे असे केंद्र सरकारचे मत असल्याचे बर्थवाल यांनी समितीला सांगितले. अमेरिकेच्या आयात कराच्या मनमानी धोरणाविरोधात कॅनडा व मेक्सिको या देशांनी तातडीने कठोर विरोध केला. भारताने मात्र ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया देखील दिली नाही, असा आक्षेप समितीतील विरोधी सदस्यांनी घेतला होता.

Story img Loader