मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला गुन्हेगार याकूब मेमन याने त्याच्या गुरूवारच्या फाशीला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी काहीही निर्णय होऊ शकला नाही. या प्रकरणातील युक्तिवाद उद्या पुढे सुरू राहतील.
याकूबने याचिकेत म्हटले आहे की, कुठलेही कायदेशीर मार्ग आपल्याला वापरण्याची संधी मिळालेली नसताना फाशीचे वॉरंट काढण्यात आले. आपली दुरूस्ती याचिका सुनावणीस आली नसतानाच फाशीचे वॉरंट काढण्यात आले.
दरम्यान, काही नागरिक, राजकारणी, कायदेतज्ज्ञ, निवृत्त न्यायाधीश यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना याकूब मेमनला दया दाखवून फाशी रद्द करावी अशी मागणी केली आहे. याकूबला मुंबई बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात २००७ मध्ये दोषी ठरवण्यात आले होते, त्या हल्ल्यात २५७ जण ठार झाले होते. याकूबची दयेची याचिका राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी गेल्याच वर्षी फेटाळली होती. माकप नेते सीताराम येचुरी, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर, भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा, वकील प्रशांत भूषण, अभिनेते नसीरू द्दीन शहा व चित्रपट निर्माते महेश भट यांनी याकूब मेमनच्या फाशीला विरोध केला आहे. त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, याकूब मेमनच्या तुलनेत इतर १० सह आरोपींनी बॉम्ब ठेवण्यात मोठी भूमिका पार पाडली होती. त्यात केवळ याकूबला दया दाखवण्यात आली नाही. तो मानसिकदृष्टय़ा अस्थिर असून त्याला स्किझोफ्रेनिया झालेला आहे व त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे त्याला फाशी देता येणार नाही.
रविवारी अभिनेता सलमान खाननेही याकूबला फाशी देण्याऐवजी टायगर मेमनला पकडून फाशी का देत नाही असा सवाल केला होता. मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा कट दाऊद इब्राहिम व टायगर मेमन यांनी आखला होता व त्यात याकूब मेमनने सक्रिय मदत केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा