भारतात करोना विषाणू विरूद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. दरम्यान, १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
या अगोदर १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास मार्चपर्यंत सुरूवात होणार असल्याची माहिती समोर आली होती. शिवाय माध्यमांमधून याबाबत बातम्या देखील झळकल्या होत्या. त्यानंतर आज वृत्ताचे खंडण करण्यात आले असून, अद्याप या बद्दल कोणताही निर्णय झालेला नसल्याचे वृत्त अधिकारीक सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
देशात करोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ वाढ दिसून येत आहे. शिवाय, करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनाचे रूग्ण देखील आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र व राज्य सरकारांकडून अधिक सतर्क होत, विविध उपाय योजनांची अंमलबाजवणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणजे १०० टक्के लसीकरणावर भर दिला जात आहे.
Covid Vaccination : १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण मार्चपर्यंत सुरू होण्याची चिन्ह
आतापर्यंत देशातील १५-१७ वर्षे वयोगटातील तीन कोटींहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. अवघ्या १३ दिवसांत या वयोगटातील सुमारे ४५ टक्के मुलांना ही लस देण्यात आली आहे. ३ जानेवारीपासून १५-१७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे.