देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट वेस्टलॅंडकडून घेण्यात येणाऱया १२ हेलिकॉप्टर्सचा करार रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांनी बुधवारी राज्यसभेमध्ये दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले.
या हेलिकॉप्टर्स खरेदी प्रकरणाची सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे. हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी इटलीतील मध्यस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात दलाली देण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे या कंपनीसोबतचा करार वादग्रस्त ठरला होता. त्या पार्श्वभूमीवरच हा करार रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही, असे ऍंटनी यांनी स्पष्ट केले. सरकारने हा व्यवहार तूर्त स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती देण्यात आली.

Story img Loader