पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे तिघेजण आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्त्व करतील, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री मनिष तिवारी यांनी पत्रकारांना सांगितले. 
मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान आहेत. सोनिया गांधी यूपीएच्याही अध्यक्षा आहेत आणि देशातील तरुणांचा ज्यांच्यावर विश्वास आहे, असे युवानेते राहुल गांधी हे तिघेजण मिळूनच लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नेतृत्त्व करतील, असे तिवारी म्हणाले. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करणार का, या प्रश्नावर तिवारी यांनी वरील उत्तर दिले.
राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगत पक्षाचे सरचिटणीस अजय माकन यांनी अजून याबाबत काहीही निर्णय झालेला नसून, तो झाल्यावर तुम्हाला कळेलच, असे सांगितले.
कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांच्यासह पक्षाच्या अन्य काही नेत्यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबतचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.

Story img Loader