राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघा एक आठवडा उरला असताना देशातील चार पिठाच्या शंकराचार्यांमध्ये या सहोळ्यावरून मतभेद असल्याचे समोर आले होते. पुरी गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या चारहीजणांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. शास्त्रातील विधीनुसार प्राणप्रतिष्ठा व्हावी, एवढेच आमचे म्हणणे आहे.
प्राणप्रतिष्ठा करण्याची पद्धत कशी असावी?
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले, “चार शंकराचार्यांमध्ये राम मंदिराच्या विषयावर मतभेत असल्याचे गैरसमज पसरविले गेले आहेत. आमच्यात कोणतेही गैरसमज नाहीत. आमचे एवढेच म्हणणे होते की, प्रभू श्री रामाची प्रतिष्ठापना शास्त्रानुसार व्हावी. देवाची प्रतिमा किंवा मूर्तीमध्ये विधीवत देवाच्या तेजाचा प्रवेश होत असतो. विधिवत पूज प्राणप्रतिष्ठा झाली नाही, तर डाकीन, शाकिनी, भूत-प्रेत-पिशाच्च चारही दिशांना पसरतात आणि सर्व छिन्न-विछिन्न करतात. त्यामुळे शास्त्रासंमत पूजा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आमचे चौघांचेही हेच म्हणणे आहे. त्यात कुठलेही मतभेद नाहीत.”
थोडक्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधीवत न झाल्यास त्याचे तेज कमी होते आणि त्यात अशुभ शक्ती वास करतात, ज्यामुळे सर्वकाही अमंगल होते, असे त्यांना सुचवायचे होते. ही भूमिका त्यांनी याआधीही मांडली होती.
मकरसंक्रातीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये गंगासागर मेळा भरला आहे. या मेळाव्यात शाही स्नान करण्यासाठी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती आलेले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले की, २२ जानेवारी रोजी मी अयोध्येत जाणार नाही. याचा अर्थ असा नाही की, मी अयोध्यावर नाराज आहे. मी कुणालाही अयोध्यात जाण्यापासून रोखतही नाही.