काही मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील काही जागा रिक्त झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबरोबरच काही फेरबदल करण्यात येणार असल्याचे संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी दिले.
जपान आणि थायलंडच्या दौऱ्यावरून माघारी येताना पंतप्रधानांनी त्यांच्या विशेष विमानात पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता वर्तवली. तसेच कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्यात मतभेद असल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले असून सर्वच मुद्दय़ांवर दोघेही मिळून काम करीत असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे पी के बन्सल आणि न्याय मंत्रालय सांभाळणाऱ्या अश्वनीकुमार यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. रेल्वे लाचप्रकरणात बन्सल यांचा पुतण्या दोषी आढळल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला तर कोळसा घोटाळा प्रकरणात अश्वनीकुमार यांनी राजीनामा दिला. या दोघांच्या राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळातील दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या मंत्रालयांची जबाबदारी अनुक्रमे सी पी जोशी आणि कपिल सिब्बल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. जोशी यांच्याकडे आधीच रस्ते आणि महामार्ग मंत्रालय तर कपिल सिब्बल यांच्याकडेही दूरसंचार मंत्रालयाचा कारभार आहे. याशिवाय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांकडे विविध खात्यांचा अतिरिक्त जबाबदारी आहे.
दरम्यान, कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि आपल्यात मतभेद असल्याचे वृत्त त्यांनी साफ फेटाळून लावले. आमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर आम्ही दोघे एकमेकांशी सल्लामसलत करतो.
यावेळी पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. विरोधी पक्ष कधी नव्हे इतके उतावळे झाले आहेत. सभागृहात अतिशय महत्त्वाची चर्चा सुरू असताना तसेच धोरणांवर निर्णय घेण्याची वेळ असताना त्यांनी कामात अडथळे निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न अतिशय चुकीचा असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे यापुढे विरोधी पक्षांनी कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर यूपीए- ३ ची बांधणी करण्यासाठी तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्याशी पुन्हा संपर्क साधणार का,असा प्रश्न विचारला असता पंतप्रधान म्हणाले की, राजकारणात कोणीही कायमचा मित्र वा शत्रू नसतो. हे आपण स्वीकारायला हवे. मात्र यूपीएची सत्ताआल्यास पंतप्रधानपदी कायम राहणार का, या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. 

Story img Loader