विविधता हे भारताचे वैशिष्टय़ आहे. वैविध्य ही साजरा करण्याजोगी बाब आहे आणि म्हणूनच धार्मिक विविधतेच्या मुद्दय़ावरून भेदभाव करणे योग्य नाही, असे उद्गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी काढले. आराधनेचे विभिन्न मार्ग आणि परंपरांमधील भिन्नता यामुळे कोणालाही विषम वागणूक देणे योग्य नाही. विश्वाच्या कल्याणासाठी लोकांनी एकोप्याच्या भावनेने राहणे आवश्यक असल्याचे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
संघ विचारधारेशी जोडल्या गेलेल्या ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ या संघटनेने आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांत धर्मातर, घरवापसी अशा मुद्दय़ांवरून देशभरात रान उठले असताना सरसंघचालकांनी अशी कलाटणी देणारी भूमिका मांडली आहे.
समाजाने शांततामय मार्गाने एकत्र राहणे हा काही कोणत्याही सामाजिक कराराचा भाग नाही. उलट समाजातील प्रत्येक घटकाने दुसऱ्याचा स्वीकार केल्याचे हे द्योतक आहे, असे भाष्य सरसंघचालकांनी केले. सध्याच्या अत्याधुनिक संकल्पना एकमेकांना सहन करण्याविषयी सुचवतात. पण आमची प्राचीन भारतीय परंपरा एकमेकांना समजून घेऊन परस्परांचा स्वीकार करण्यास शिकवते, याची आठवण भागवत यांनी करून दिली.
केवळ उपयोगिता हा स्वीकाराचा निकष असता कामा नये. विविध परंपरा दिसत जरी वेगळ्या असल्या तरी त्या शेवटी एकच असतात. एकोपा हेच शाश्वत सत्य आहे. सर्वच टिकले पाहिजे आणि त्यामुळे सर्व वैविध्य स्वीकारले पाहिजे, असे आपली परंपरा सांगते, असेही भागवत म्हणाले.  

विविधता हे खरे तर शक्तिस्थान आहे. परंपरा आणि उपासना यांतील वैविध्यासह नागरिकांमधील शांततामय सहजीवन आवश्यक आहे. त्यादृष्टीने एकमेकांना बरोबर घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे. विश्व एक आहे. या विश्वाच्या कल्याणासाठी लोकांनी एकोप्याच्या भावनेने एकत्र राहणे आवश्यक आहे.
– मोहन भागवत, सरसंघचालक

Story img Loader