इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या पाच दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर क्षेपणास्रांचा मारा सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत २,३०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे, तर जखमींची संख्या ७,००० च्या पुढे आहे. इस्रायल बेसावध असताना हमासच्या दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे युद्धाच्या पहिल्या दोन दिवसांत इस्रायलमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. पहिल्या दिवशी इस्रायलची पिछेहाट सुरू होती. परंतु, इस्रायलनेही या धक्क्यातून सावरत गाझा पट्टीवर प्रतिहल्ला चढवला. तसेच हमासच्या गाझा पट्टीतल्या तळांवर क्षेपणास्र डागली. युद्धासह इस्रायलने अनेक आघाड्यांवर पॅलेस्टाईनला कोंडित पकडलं आहे. इस्रायलने गाझा पट्टीत पाणी, वीज आणि इंधनाचा पुरवठा बंद केला आहे. यामुळे गाझा पट्टीत राहणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत.
दरम्यान, इस्रायलचे ऊर्जामंत्री काट्ज यांनी हमासला कडक शब्दांत इशारा दिला आहे. काट्ज म्हणाले, हमासचे दहशतवादी त्यांनी अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांना, ओलिसांना सोडणार नाहीत तोवर गाझा पट्टीत पाणी आणि इंधनाचा पुरवठा केला जाणार नाही.
ऊर्जामंत्री काट्ज यांनी एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, इस्रायली ओलीस मायदेशी परतत नाहीत तोवर गाझा पट्टीसाठी वीजेचं बटन ऑन केलं जाणार नाही. पाण्याचा नळ सुरू केला जाणार नाही. त्याचबरोबर त्यांना कुठल्याही प्रकारचं इंधन मिळणार नाही. गाझाला कुठल्याही प्रकारची मानवी मदत मिळणार नाही.
हे ही वाचा >> Israel Hamas War : ‘हे’ सहा शक्तीशाली देश इस्रायलच्या बाजूने, तर सात राष्ट्रांचा पॅलेस्टाईनला पाठिंबा?
इस्रायलने एका बाजूला गाझा पट्टीची नाकेबंदी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला युद्ध परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्कालीन युद्ध सरकार स्थापन केलं आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि विरोधी पक्षनेते बेनी गॅंट्झ यांनी हमासच्या दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी आपत्कालीन युद्ध सरकार बनवलं आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर क्षेपणास्र डागल्यानंतर इस्रायलच्या हवाई दलानेही गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हवाई हल्ले सुरू केले. त्यापाठोपाठ इस्रायलनं सपूर्ण नाकेबंदीचं हत्यार उपसलं आहे. त्यामुळे हमासची गाझा पट्टीत चांगलीच कोंडी झाली आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव गॅलंट यांनी गाझा पट्टीत संपूर्ण नाकेबंदीचे आदेश दिले आहेत. तिथली वीज बंद करण्यात आली आहे. तिथला अन्नपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच इंधनपुरवठाही बंद करण्यात आला आहे.