सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी स्वातंत्र्य दिनीनिमित्त पाकिस्तानी लष्कराकडून देण्यात येणाऱया शुभेच्छा आणि मिठाई न स्वीकारण्याचा निर्णय सीमा सुरक्षा दलाने घेतला आहे. परंपरेप्रमाणे पाकिस्तानच्या निर्मिती दिनी आणि भारताच्या स्वातंत्र्य दिनी दोन्ही देशांच्या जवानांकडून एकमेकांना शुभेच्छा आणि मिठाई दिली जाते. मात्र, हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैनिकांना शुभेच्छा न देण्याचा आणि त्यांच्याही शुभेच्छा न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये आणि त्याआधी पंजाबमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर आणि पंजाब पोलीसांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यातही यश आले होते. हा दहशतवादी पाकिस्तानातूनच घुसखोरी करून भारतात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या जवानांकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त येणाऱया शुभेच्छा आणि मिठाई स्वीकारू नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे. वाघा बॉर्डरवर दोन्ही देशांचे जवान एकमेकांना शुभेच्छा देत असतात. मात्र यावेळी आम्ही शुभेच्छा देणारही नसून, स्वीकारणारही नसल्याचे सीमा सुरक्षा दलाचे पंजाब विभागाचे महानिरीक्षक अनिल पलिवाल यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा