संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणात दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या प्रयत्नांमध्ये खरेतर शून्य सहनशीलता अपेक्षित असताना त्यात काही प्रमाणात सौम्यता आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. जर तसे केले तर भारत यापुढे आताच्या ठरावानंतर अशा कुठल्याच ठरावाला पाठिंबा देणार नाही असे सांगण्यात आले.
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक दहशतवाद धोरण सल्लामसलतीच्या द्वैवार्षिक चौथ्या आढाव्यात भारताने अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात भारतीय दूतावासावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा तीव्र  निषेध केला.
अफगाणिस्तानची फेरबांधणी व विकास यांना विरोध करण्यासाठी हे दहशतवादी हल्ले होत आहेत. अफगाणिस्तानातील सुरक्षा दलांनी या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून भारताने २२ मे रोजीच्या चीनमधील उरूमकी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. त्या हल्ल्यात स्फोटकांच्या मदतीने वायव्येकडील झिनझियांग प्रांतात ४० जणांना ठार करण्यात आले होते, तर ९० जण जखमी झाले होते.
या दोन हल्ल्यांमुळे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ठराव करणे गरजेचे आहे. कुठल्याही कारणास्तव दहशतवादाचे समर्थन करता येणार नाही, असे भारतीय प्रतिनिधी मंडळाने अनौपचारिक सल्लामसलतीत भाग घेताना म्हटले आहे.  चौथ्या फेरआढावा बैठकीची अंतिम बैठक १२-१३ जून दरम्यान होणार असून, त्यानंतर याबाबतचा अंतिम धोरण प्रस्ताव मंजूर केला जाणार आहे. यापूर्वी असा एक ठराव आमसभेने सप्टेंबर २००६ मध्ये मंजूर केला होता. भारताचे धोरण दहशतवादाबाबत शून्य सहनशीलता असेच राहिले असून, धोरणात सौम्यता आणणे आम्हाला पटणारे नाही असे मत भारतीय प्रतिनिधी मंडळाने व्यक्त केले आहे.