बलुचिस्तानातील नेते अकबर बुगती यांच्या हत्येच्या खटल्यास उपस्थित न राहण्याची कायमस्वरूपी सवलत द्यावी, ही पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची याचिका दहशतवादविरोधी न्यायालयाने मंगळवारी सपशेल फेटाळून लावली.
मुशर्रफ हे पाकिस्तानचे अध्यक्ष असताना २००६ मध्ये करण्यात आलेल्या लष्करी कारवाईत बुगती ठार झाले होते. त्यामध्ये मुशर्रफ आणि अन्य आरोपींची नेमकी भूमिका काय होती याबाबत क्वेट्टातील न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
न्यायालयाने मुशर्रफ यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र मंगळवारीही ते न्यायालयात हजर राहिले नाहीत. सुरक्षा आणि वैद्यकीय कारणास्तव मुशर्रफ हे न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना अनुपस्थित राहण्याची कायमस्वरूपी परवानगी द्यावी, अशी याचिका मुशर्रफ यांच्या वकिलांनी केली होती.
सदर मागणी फेटाळून लावताना न्यायालयाने मुशर्रफ यांची प्रकृती कशी आहे याची तपासणी करण्यासाठी एक वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे मुशर्रफ यांना सुरक्षा पुरवावी, असे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले. न्यायालयात हजर न राहण्याची केवळ एका दिवसाची सवलत मुशर्रफ यांना देण्यात आली आणि पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा