पर्यावरण मंत्रालयातील कोणतीही फाइल प्रलंबित ठेवली जाणार नाही, असे सांगून प्रकल्प मंजूर करताना आपल्या मंत्रालयाच्या प्रतिमेशी कोणतीही तडजोडही करण्यात येणार नाही, असे केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. जयंती नटराजन् यांनी पर्यावरण मंत्रालयाचा राजीनामा दिल्यानंतर मोईली यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून त्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोईली यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.
आपल्याशी संबंधित प्रत्येक फाइल सायंकाळपर्यंत निकाली लागलेली असते. पर्यावरण मंत्रालयाशी संबंधित असलेल्या फायलींचेही असेच स्वरूप राहील. विशिष्ट फायलीसंबंधी आणखी निरीक्षण आवश्यक असेल तर ती बाब वगळता एकही फाइल घरी नेण्यात येणार नाही, असे मोईली यांनी नमूद केले. मोईली यांनी आपला पदभार स्वीकारण्यापूर्वी मोईली यांनी जयंती नटराजन् यांची भेट घेतली.
पेट्रोलियम खातेही संभाळत असल्यामुळे त्या खात्याच्या अनेक प्रकल्पांना पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत उभय खात्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता मोईली यांनी फेटाळून लावली. प्रत्येकाची स्वतंत्र जागा असते. पेट्रोलियम मंत्रालयास जशी स्वत:ची जागा आहे, तशीच पर्यावरण मंत्रालयासही स्वत:ची जागा आहे. त्यामुळे प्रत्येक मंत्रालयाने घालून दिलेल्या नियमावलीच्याच आधारे आपल्याला पुढे जायचे असल्यामुळे असा संघर्ष होईल असे वाटत नाही. हे नियम आपल्याला मोडता येणार नाहीत, असे मत मोईली यांनी मांडले.  अशा प्रकारच्या संघर्षांबद्दल बोलताना आपल्याला कायदा, कंपनी व्यवहार आणि पेट्रोलियम खात्यांचा अनुभव असून ती कार्यक्षमरीत्या संभाळली असल्याचा दावा मोईली यांनी केला.
आपण पर्यावरण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यामुळे मंत्रालयाच्या हरीत प्रतिमेविषयी तडजोड होण्यासंबंधीचा विरोधकांचा दावा मोईली यांनी फेटाळून लावला. येथे कोणतीही तडजोड संभवत नाही. पर्यावरणाच्या मूलभूत तत्त्वांशी तडजोड आपल्याला मान्य नसल्याचे मोईली यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा