दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्या मराठी द्वेषामुळे सदनात होणाऱ्या गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट आहे. मलिक यांच्या अरेरावीमुळे गणेशोत्सवासारख्या सामाजिक सलोखा वृद्धींगत करणाऱ्या कार्यक्रमास दिल्लीकरांना मुकावे लागणार आहे.  सदनात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी येथील कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव समिती स्थापन करतात. ही समिती राज्य सरकारकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवते. यंदा मलिक यांच्या दहशतीमुळे ही समिती स्थापन करण्यात आली नाही. त्यामुळे राज्य शासनाकडे सदनात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रस्तावदेखील पाठवण्यात आलेला नाही.
मराठी वातावरण, मराठी जेवण तर सोडाच साधा मराठी शिष्टाचारदेखील नसल्याने मराठी माणसाला महाराष्ट्र सदन कधीही आपले वाटत नाही. पण तरिही महाराष्ट्र सदनात अस्सल मराठमोळ्या वातावरणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात दिल्लीकर उत्साहाने सहभागी होतात. गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव साजरा होतो. त्यासाठी सदनातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची सार्वजनिक गणेशोत्सव समिती आहे. ही समिती राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधी देण्याची विनंती करते. मलिक यांचा अपवाद वगळता अन्य अधिकारी, मुख्यमंत्र्यांचा गणेशोत्सवासाठी सदैव पुढाकार असतो. विशेष म्हणजे एरव्ही आठ लाख रूपये देणाऱ्या राज्य सरकारने गतवर्षी सदनातील गणेशोत्सवासाठी दहा लाख रूपयांचा निधी दिला होती. परंतु गेल्या तीन वर्षांपासून निवासी आयुक्तपदावर ठाण मांडून बसलेल्या मलिक यांनी सातत्याने गणेशोत्सवाला विरोध केला.    मात्र मलिक यांनी कधीही उघडपणे विरोध केला नाही. त्यांच्या छुप्या विरोधाला न जूमानता गतवर्षी सदनातील वरिष्ठ अधिकारी नंदिनी आवाडे यांनी गणेशोत्सवाचे आयोजन केले होते. गणेशोत्सवास अवघे आठ दिवस शिल्लक असताना आवाडे यांनी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवून वैविध्यपर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. यंदा मात्र आवाडे यांची महाराष्ट्रात बदली झाली आहे. गणेशोत्सवासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या नंदिनी आवाडे अध्यक्ष होत्या.
परंतु त्यांची बदली झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले आहे. मलिक यांचा मराठी द्वेष व व्यक्तिगत आकस नको म्हणून सदनातील एकही कर्मचारी या समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नाही. समितीने प्रस्ताव पाठवल्याशिवाय राज्य सरकारकडून निधी मिळणार नाही. शिवाय मलिक स्वतहून गणेशोत्सव आयोजनासाठी पुढाकार घेणार नाहीत. त्यामुळे दिल्लीकर मराठी माणसाला सदनाती गणेशोत्सवाला मुकावे लागणार आहे.

Story img Loader