‘एनआरसी’बाबत मोदी यांची ग्वाही
सिल्चर : राष्ट्रीय नागरिक नोंदणीतून (एनआरसी) कोणत्याही खऱ्या नागरिकाला वगळले जाणार नाही, असी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिली. नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाला संसदेत मंजुरी मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. आसाममधील कालीनगर येथे विजय संकल्प समावेश रॅलीमध्ये ते बोलत होते.
राष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये अनेकांना अडचणी जाणवत असल्याची मला कल्पना आहे. पण मी खात्री देतो की एकाही खऱ्या नागरिकाला त्यातून वगळले जाणार नाही आणि कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असे मोदी म्हणाले.
केंद्र सरकार नागरिकत्व (सुधारणा) विधेयक संसदेत दाखल करत आहे. ते लवकरच संमत होईल अशी आशा करतो. ते कोणाचाही फायदा करून देण्यासाठी नाही तर आजवर ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यासाठी आणि ज्यांनी गैरफायदा घेतला त्यांना शासन करण्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.