प्रजासत्ताकदिनी सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत राज्यघटनेच्या सरनाम्यातील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द वगळण्यात आल्याच्या कारणावरून बुधवारी मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून टीकेचा जोरदार मारा होऊनही सरकारने मौन बाळगणेच पसंत केले. मात्र, गुरूवारी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर पलटवार करताना काही सवाल उपस्थित केले. काही ऐतिहासिक मुद्द्यांसंदर्भात आपले मत व्यक्त करण्यास काय हरकत आहे. जाहिरातीत राज्यघटनेच्या मूळ सरनाम्याच्या प्रतीचे छायाचित्रे देण्यात आले आहे. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांच्या उपस्थितीत राज्यघटनेचा मूळ सरनामा तयार करण्यात आला होता. त्यावेळी सरनाम्यात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्दांचा समावेश नव्हता. याचा अर्थ नेहरूंना धर्मनिरपेक्षपणाची संकल्पना समजली नव्हती, असा होतो का?… आणीबाणीच्या काळात या दोन शब्दांचा सरनाम्यात समावेश करण्यात आला. त्याच्यावर आता जाहीर चर्चा होत असेल तर त्यात काहीही हानीकारक काही नाही, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
तत्पूर्वी बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडूनही सरनाम्यातील धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द कायमचे वगळण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

Story img Loader