करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर २१ दिवसांची टाळेबंदी लागू केली असून, ही कालमर्यादा आणखी वाढवणार नाही. तसेच टाळेबंदीच्या काळात सर्व बँकांच्या शाखा, एटीएम सुरू राहतील, असे केंद्र सरकारने सोमवारी स्पष्ट केले. या दोन्ही मुद्दय़ांबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवून नये, असे आवाहनही सरकारने केले.

देशभरात ठिकठिकाणी मजूर आपापल्या गावी जात असल्याचे चित्र असल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून टाळेबंदीचा कालावधी वाढवला जाऊ शकतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. त्याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने अशी कोणतीही शक्यता नसल्याचे जाहीर केले. अफवा पसरवल्या जात असून टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सांगितले.

दोन अधिकारी निलंबित

केंद्राने राज्य सरकारांना सीमाबंद करण्याचा आदेश दिलेला असून रोजंदारी मजुरांच्या दोन वेळच्या जेवणाची सोयही करण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीहून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या हजारो मजुरांसाठी गेले दोन दिवस उत्तर प्रदेश सरकारने बसगाडय़ा उपलब्ध करून दिल्या. मात्र, टाळेबंदी लागू करण्यात चूक झाल्याबद्दल दिल्लीच्या वाहतूक खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव या दोन अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने निलंबित केले.

एटीएमसह सर्व बँका खुल्या : सीतारामन

बँका आणि एटीएम बंद ठेवली जाणार नाहीत. देशातील सर्व बँकांनी त्यांच्या शाखा खुल्या ठेवल्या आहेत. एटीएममध्ये पुरेशी रोकड आहे. ग्रामीण भागांमध्ये बँक प्रतिनिधीही कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पैसे पोहोचवले जात आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटद्वारे दिली. बँकांच्या सर्व शाखा खुल्या न ठेवण्याचा विचार रिझव्‍‌र्ह बँक करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सीतारामन यांनी जनतेला आश्वस्त केले.