नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपण पाकिस्तान दौऱ्यामध्ये कोणाशीही द्विपक्षीय चर्चा करणार नाही असे शनिवारी स्पष्ट केले. जयशंकर शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेसाठी १५ आणि १६ ऑक्टोबरला इस्लामाबादला जाणार असल्याची घोषणा परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी केली.

जयशंकर यांच्या रूपाने तब्बल नऊ वर्षांनी भारताचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानला जाणार आहेत. दोन्ही देशांदरम्यानच्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या दौऱ्यात ते पाकिस्तानच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मात्र, आपण तेथे बहुपक्षीय परिषदेसाठी जात आहोत, द्विपक्षीय चर्चेसाठी नाही, असे जयशंकर यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले.

दरम्यान, यापूर्वी दिवंगत सुषमा स्वराज यांनी डिसेंबर २०१५मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. गेल्या वर्षी एससीओ परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनीही भारताचा दौरा केला होता.

हेही वाचा >>> Exit Poll Results 2024 : जम्मू व काश्मीर, हरियाणात ‘इंडिया’? मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज; दोन्हीकडे भाजपला धक्का

इस्लामाबाद, लाहोरमध्ये लष्कर तैनात

इस्लामाबाद/लाहोर : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांच्या आंदोलनाला रोखण्यासाठी शनिवारी इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. पाकिस्तानात १५-१६ ऑक्टोबर रोजी एससीओ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान दोन्ही शहरांत लष्कर तैनात राहणार आहे. न्यायव्यवस्थेबरोबर निकटता भाव दाखवण्यासाठी, महागाईला विरोध आणि इम्रान खान यांच्या सुटकेसाठी ‘पीटीआय’चे आंदोलन सुरू आहे.

जयशंकर यांनी आंदोलनात सहभागी व्हावे

‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’च्या एका नेत्याने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना इस्लामाबादमध्ये निषेध आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जयशंकर १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये ‘एससीओ’ शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. खैबर पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांचे माहिती सल्लागार मुहम्मद अली सैफ यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांना निषेध आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.

भारत-पाकिस्तान संबंधांच्या स्वरूपामुळे या दौऱ्यामध्ये माध्यमांना विशेष रस असेल. मी तेथे बहुपक्षीय परिषदेसाठी जात आहे. मी तेथे भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चा करण्यासाठी जात नाही. मी एससीओचा सदस्य म्हणून जात आहे.– एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री