तंबाखूजन्य उत्पादनांमुळे कर्करोग होतो असे, कुठलाही भारतीय अभ्यास सांगत नसल्याचा अहवाल खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने दिला आहे. तंबाखू उत्पादकांच्या दबावाचे प्रतिबिंब या अहवालावर दिसून येते. मात्र गांधी यांनी सोमवारी केलेल्या विधानाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खंडन केले आहे. विज्ञान हे विज्ञान असते, त्यामुळे अशी विधाने गैर आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तंबाखू सेवनाने कर्करोग होत नाही, असे आपण म्हणालोच नव्हतो. फक्त कोणताही निर्णय घेताना त्यासाठी परदेशाऐवजी आपल्याच देशात पाहणी व्हायला हवी, असे स्पष्टीकरण दिलीप गांधी यांनी दिले आहे.
खासदार दिलीप गांधी या संसदीय मंडळाचे प्रमुख होते. सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ मध्ये काही बदल सुचवणे हे होते, त्यात तंबाखूजन्य उत्पादनांवर कर्करोगाचा इशारा देणारी चित्रे मोठय़ा स्वरूपात छापावीत अशी तरतूद होती, पण आता ती लांबणीवर टाकण्यात आली आहे. नगरचे खासदार दिलीप गांधी यांनी मात्र तंबाखूचे धोके सांगणाऱ्या चित्रांचा आकार मोठाच ठेवावा, असे म्हटले आहे. चित्राचा आकार सध्या ४० टक्के असून, तो ८५ टक्के करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याला तंबाखूजन्य उत्पादनांच्या उत्पादकांचा आक्षेप आहे. तंबाखूने कर्करोग होतो याबाबतचे सगळे अहवाल परदेशातील आहेत, त्यांचा भारतीय दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, असे उत्पादकांच्या दबावगटाने म्हटले आहे. त्याचे प्रतिबिंब या अहवालात उमटले.
गांधी यांनी सांगितलेकी, तंबाखूचे वाईट परिणाम सर्वाना माहीत आहेत. पण तंबाखूमुळे कर्करोग होतो असे कुठलाही भारतीय अहवाल सांगत नाही. ते सर्व अहवाल परदेशातील आहेत. कर्करोग हा केवळ तंबाखूमुळे होत नाही. आपण भारतीय दृष्टिकोनातून याचा विचार केला पाहिजे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व छत्तीसगड ही राज्ये तेंदूपत्त्याच्या माध्यमातून बिडी उद्योगावर बरीच अवलंबून आहेत. भारतीय दृष्टिकोनातून अभ्यास होईपर्यंत चित्रांचा आकार मोठा करण्याची तरतूद आमच्या समितीने लांबणीवर टाकली आहे, असे गांधी यांनी म्हटले आहे. सिगारेट अँड अदर टोबॅको प्रॉडक्टस रूल्स २००८ यानुसार जी दुरुस्ती अधिसूचना काढली आहे. त्यानुसार तंबाखूच्या धोक्यांचा इशारा देणारे चित्र हे ४० टक्क्य़ांऐवजी ८५ टक्के मोठे असले पाहिजे. तसे केले तर चित्रातून धोक्याचा संदेश जास्त प्रभावीपणे देणारा भारत हा पहिला देश ठरला असता.
भारतात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असून दरवर्षी ७५ ते ८० हजार रूग्णांना हा रोग होत आहे, असे मत नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या संस्थेने आरोग्य मंत्रालयाच्या मदतीने केलेल्या संशोधनानुसार व्यक्त केले होते. जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य मंत्रालय यांच्या पीएचएफआय अभ्यासानुसार तंबाखूजन्य उत्पादनांमुळे होणाऱ्या रोगांवरील उपचारांचा खर्च व आर्थिक फटका २०११ मध्ये १०४५०० कोटी रुपये होता.
तोंडाच्या कर्करोगाचे –प्रमाण ७५ ते ८० हजार
तंबाखूजन्य आजारांवरचा -खर्च – १०४५०० कोटी (२०११)