‘ऑफिसमध्ये काम आहे, यावेळी वीकऑफही नाही, सगळ्या सुट्ट्या रद्द केल्या’, अशा आशयाचे संवाद आपण अनेकदा ऐकत असतो. नोकरदार वर्गासाठी ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढतो तेव्हा अशा प्रकारे सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय काही कार्यालयांमध्ये घेतला जातो. काही ठिकाणी यासाठी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मानधन दिलं जातं तर काही ठिकाणी आहे त्याच मानधनामध्ये या गोष्टी करून घेतल्या जातात. वेगवेगळ्या परिस्थितीत कर्मचारी वर्ग काम करत असतो. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारची एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट कोणत्या ऑफिसमधली आहे, हे निश्चित नसलं, तरी त्यावरील मजकुरामुळे मात्र नेटिझन्सकडून भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी त्यांच्या व्यथाही मांडल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे या व्हायरल पोस्टमध्ये?

रेडइट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या या पोस्टचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं दिलं आहे. या पोस्टमध्ये एका कार्यालयात लावण्यात आलेल्या एका नोटीसचा फोटो शेअर करण्यात आला आहे. “कॉर्पोरेट कंपन्यांना असं का वाटतं ही हे असं करणं ठीक आहे? देव न करो पण जर एखादी व्यक्ती आजारी पडली, तर कंपनी त्या व्यक्तीचा विचारच करणार नाही”, अशी कॅप्शन या पोस्टसोबत देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये येत्या २५ नोव्हेंबरपासून ते ३१ डिसेंबरपर्यंत म्हणजे जवळपास सव्वा महिना कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुट्टी घेता येणार नाही, असं नमूद करण्यात आलं आहे.

नोटीसचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

“२५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या काळात कार्यालयात सुट्ट्यांवर ‘ब्लॅकआऊट’ असेल. या काळात सुट्ट्या घेणे, कामातून काही काळ वेळ काढणे अशा गोष्टी बंद असतील. अचानक आलेल्या कामानिमित्त सुट्ट्या घेणे, आजारी पडल्यामुळे त्यासाठी सुट्टी घेणे अशा गोष्टीही याला अपवाद असणार नाहीत. हा काळ आपल्यासाठी कामाच्या दृष्टीने वर्षभरातला सर्वात व्यग्र काळ असणार आहे. आपल्याला सर्वजण कामावर असण्याची आवश्यकता असेल. धन्यवाद”, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

“तुम्ही मेलात तरी तुम्हाला तीन दिवस आधी…”

दरम्यान, ही नोटीस व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एका युजरनं रेडइटवरील या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, “जर तुम्ही मेलात, तर तुम्हाला व्यवस्थापनाला त्यासंदर्भात तीन दिवस आधी कळवावं लागेल”, अशी उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे. दुसऱ्या युजरनं एका व्यक्तीबद्दल माहिती दिली आहे. “मी अशा एका व्यक्तीला ओळखतो, ज्याच्या मालकीची एक कंपनी आहे. तो उन्हाळ्यात कुणालाच सुट्टी देत नाही. त्याच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचाही खूप ताण आहे. पण त्यांना पगार मात्र कमी दिला जातो. त्याचे कर्मचारी नोकरी सोडतात. मग तो तक्रार करत राहतो की लोक नोकऱ्या सोडतायत, लोकांना नोकऱ्यांची गरजच नाहीये”, असं या युजरनं लिहिलं आहे.

पूर्ण जानेवारी महिना सुट्टी!

दरम्यान, एका युजरनं त्याच्या जवळच्या कॉफी शॉपसंदर्भात पोस्ट केली आहे. “माझ्या घराजवळ एक कॉफीशॉप आहे. दोन बहि‍णींच्या मालकीचं ते शॉप आहे. त्या स्वभावाने खूप चांगल्या आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यात ते पूर्ण महिना शॉप बंद ठेवतात. पण तरीही कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचा पूर्ण पगार देतात”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No leaves for one month company post viral on social media trending news pmw