गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यामुळे १३० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. नदीत कोसळलेला हा पूल १०० वर्षे जुना असल्याचे म्हटले जात आहे. या पुलावर काही तरुण उड्या मारतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर दुर्घटनेमागे तरुणांची हुल्लडबाजी कारणीभूत असल्याचा दावा केला जातोय. ही दुर्घटना ताजी असतानच आता कर्नाटकमधील येल्लापुरा शहरातील अशाच एका झुलत्या पुलाचा व्हिडीओ समोर आला आहे. या पुलावर पर्यटकांनी चक्क कार आणल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मोरबी येथील दुर्घटना ताजी असतानाच हा व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा >> VIDEO : पंतप्रधान मोदींची मोरबी दुर्घटनास्थळी भेट; अधिकाऱ्यांकडून घेतली घटनेची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ कर्नाटकधील येल्लापुरा शहरातील असून येथील झुलत्या पुलावर कार चालवणारे पर्यटक हे महाराष्ट्रातील असल्याचे सांगण्यात येत आहे. हे पर्यटक चक्क झुलत्या पुलावर कार चालवत आहेत. हा पूल साथोडी धबधब्यापासून साधारण ५ किमी दूर असून तो येल्लापुरा शहराला उलुवी आणि दंडेली या शहरांशी जोडतो. पर्यटक पुलावर चक्क कार घेऊन आल्याचे समजाच येथील स्थानिकांनी हस्तक्षेप केला. तसेच पर्यटकांना कार परत न्यायला लावली. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
हेही वाचा >> पंतप्रधान मोदींच्या मुरबी दौऱ्यापूर्वी रुग्णालयाला रंगरंगोटी, विरोधकांची टीका; म्हणाले, “फोटोशूट…”
दरम्यान, रविवारी मोरबी येथे झुलता पूल तुटल्यामुळे १३० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा गुजरात तसेच केंद्र सरकारने केली आहे. तसेच आज (१ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची पाहणी करून जखमी लोकांची भेट घेतली.