वाहनांच्या मागील बाजूस ‘हॉर्न ओके प्लीज’ असा संदेश लिहीलेल्या वाहनचालकांवर आता परिवहन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. वाहनांच्या मागे विशेष करून ट्रक आणि टेम्पोमागे लिहीला जाणारा ‘हॉर्न ओके प्लीज’ या संदेशातून केव्हाही हॉर्न वाजविण्याचा चूकीचा संदेश दिला जात असल्याचे राज्य वाहूतक आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले. त्यामुळे अशा संदेशावर राज्यात बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉर्न ओके प्लीज असा संदेश लिहीलेली वाहने आढळल्यास कारवाई करण्याचे आदेशही आरटीओंना देण्यात आले आहेत. बऱ्याच ट्रक आणि बसच्या मागील बाजूस ‘हॉर्न ओके प्लीज’असा संदेश असतो. अशाप्रकारचा संदेश पाहून अप्रत्यक्षरित्या वाहनचालकांना हॉर्न वाजविण्याचे उत्तेजन मिळत असल्याचे महेश झगडे म्हणाले. परिवहन नियमांमध्ये बदलांची गरज असून त्यादृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचेही ते पुढे म्हणाले.
अशा प्रकारचा संदेश ट्रक, टेंपो यांसारख्या मालवाहतूक वाहनांसह इतर प्रवासी वाहनांवरही लिहिलेला असतो. असा संदेश लिहिणे परिवहन कायद्याचे उल्लंघन आहे. मात्र, यामुळे कुठेही हॉर्न वाजवण्याची परवानगी असल्याचा चुकीचा संदेश जनमानसात जात असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. या संदेशामुळे शांतता क्षेत्राचा नियमही पायदळी तुडवला जात असून, सर्रासपणे अकारण हॉर्न वाजविण्यात येत असल्याचे परिवहन विभागाचे मत आहे. त्यामुळे हा संदेश प्रदर्शित केलेल्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी उचित कारवाई करावी आणि संदेश संबंधित वाहतूकदाराकडून जागीच काढून टाकण्यात यावा, असे आदेश आरटीओंना देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा