कानपूरमध्ये या वर्षी मोहरमची मिरवणूक न काढण्याचा निर्णय स्थानिक मुस्लीम नेत्यांनी घेतला आहे. ३ जून रोजी झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच याबाबत पोलीस प्रशासनालादेखील लेखी पत्र दिले असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – ४०० अध्यादेश काढता, पण एक समिती स्थापन करण्यासाठी वेळ नाही? – उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी, यासाठी तंजीम-अल-पैक कासीद-ए-हुसेन आणि तंजीम निशान-ए-पॅक कासीद-ए-हुसैन या दोन्ही खलिफांनी यंदा कानपूरमध्ये मोहरमची मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी पोलीस प्रशासनाला देखील याबाबत माहिती दिली आहे. दोन्ही खलिफांनी शुक्रवारी पोलीस सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत ३ जून रोजी झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण शांत राहावं, त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

हेही वाचा – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर

शहरातील वातावरण लक्षात घेऊन यंदा मिरवणूक न काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे कोणीही मिरवणुकीची तयारी करू नये, अशी प्रतिक्रिया तंजीम-अल-पैक कासीद-ए-हुसेनचे खलिफा अच्छा मियाँ यांनी दिली. तसेच प्रत्येकाने शहरात शांतता राहावी, यासाठी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर शहरातील तणावपूर्ण वातावरण बघता कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रिया तंजीम निशान-ए-पॅक कासीद-ए-हुसैनचे खलिफा शकील अहमद खान यांनी दिली.