नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून) तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील एकण ७२ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. मोदी सरकारचं खातेवाटप अद्याप झालेलं नसलं तरी मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्याकडील जुनी खाती कायम राहतील, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात मित्रपक्षांचे अनेक चेहरे दिसत आहेत. कारण २०१४ आणि २०१९ प्रमाणे एकट्या भाजपाला बहुमत मिळालेलं नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २८२ जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी ३०२ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे भाजपाला सत्तास्थापनेसाठी इतर पक्षांवर अवलंबून राहावं लागलं नव्हतं. परिणामी भाजपाने तेव्हा इतर पक्षांना मोठी मंत्रिपदं दिली नव्हती. तसेच मंत्रिमंडळात इतर पक्षांमधील केवळ तीन ते चारच चेहरे होते. मात्र यावेळी भाजपाला केवळ २४५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपा मित्रपक्षांच्या सहकार्यावर अवलंबून आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाचं हे सरकार प्रामुख्याने चंद्राबाबू नायडू यांची तेलुगू देशम पार्टी आणि नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. त्यामुळे या दोन पक्षांनी केंद्र सरकारमध्ये मोठी खाती मागितली आहेत. दरम्यान, मोदींच्या या तिसऱ्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम चेहरा नाही. तसेच या मंत्रिमंडळात केवळ पाच इतर अल्पसंख्याक (मुस्लिम वगळता) चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

मोदी कॅबिनेट ३.० मध्ये एकूण ७२ मंत्री आहेत. ज्यापैकी ३० कॅबिनेट मंत्री आहेत. तर पाच राज्यमंत्र्यांकडे स्वतंत्र कारभार आहे. उर्वरित ३७ जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. या मंत्रिमंडळात पाच अल्पसंख्यांक मंत्री असले तरी यामध्ये एकही मुस्लिम चेहरा नाही हे विशेष. या मंत्रिमंडळात रवनीतसिंग बिट्टू (शीख), हरदीपसिंग पुरी (शीख), जॉर्ज कुरियन (ख्रिश्चन), किरेन रिजिजू (बौद्ध) आणि रामदास आठवले (बौद्ध) या पाच अल्पसंख्यांक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> “भाजपाने आमच्याबरोबर दुजाभाव केला”, शिंदे गटाची खदखद; मंत्रिपदांवरून एनडीएत वाद पेटला?

रामदास आठवले हे मोदींच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री होते. किरेन रिजिजू हे मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते, तर दुसऱ्या मंत्रिमंडळात कायदा आणि न्यायमंत्री (कॅबिनेट) होते. जॉर्ज कुरियन हे केरळमधील भाजपाचा मोठा चेहरा मानले जातात. कुरियन ना लोकसभा निवडणूक जिंकले आहेत, ना त्यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. तरीदेखील त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. भाजपा लवकरच त्यांना राज्यसभेवर घेऊ शकते. ते यापूर्वी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष होते. हरदीपसिंग पुरी हे मोदींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात पेट्रोलियम आणि नैसर्गिग गॅस विभागाचे मंत्री होते.

दरम्यान, मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात एकूण सात महिलांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील रक्षा खडसे यांचा समावेश करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No muslim took oath as union minister first time in indian history pm modi swearing in ceremony asc