चीनमधील करोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आल्याने जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातही सतर्कतेची पावले उचलण्यात येत आहे. त्यात करोना लसीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. करोना लसीची वर्धक मात्रा घेतलेल्यांना नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीसाठी नोंदणी करता येणार नाही, अशी माहिती करोनासंदर्भातील सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. एन के अरोरा यांनी दिली.
डॉ. एन के अरोरा यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना सांगितलं की, “चीनमधील करोनाची स्थिती, लसीकरण याबद्दल मोठ्या प्रमाणात अस्पष्टता आहे. पण, चीनमधील करोना परिस्थितीने आपल्याला सावध केलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.”
हेही वाचा : देशभरात करोना उपचारांची सज्जता; विविध राज्यांतील रुग्णालयांत सराव
“सामूहिक प्रतिकारशक्ती हा गुंतगुंतीचा विषय आहे. भारतात करोनाच्या तीन लाटा आल्याने अनेक लोक संसर्गाच्या संपर्कात आले आहेत. १२ वर्षाखालील ९६ टक्के लहान मुलांना करोना होऊन गेला आहे. तरीही भारताची परिस्थिती चीनपेक्षा चांगली आहे. कारण, नैसर्गिक प्रतिकारशक्ती आणि करोनाच्या लसीचा फायदा भारताला झाला आहे,” असं अरोरा यांनी सांगितलं.
हेही वाचा : चीनमधील करोना उद्रेक कशामुळे? कोविड पॅनेलचे प्रमुख अरोरा यांनी सांगितलं, म्हणाले “तेथे चार…”
“चीनमधील करोना रुग्णवाढीला ‘बीएफ७’ हा प्रकार फक्त १५ टक्के कारणीभूत आहे. ‘बीएन’ आणि ‘बीक्यू’ या करोनाच्या प्रकारातील ४० टक्के रुग्ण चीनमध्ये आहेत. चीनमधील लोकांना मिळणारी लस प्रभावी नसल्याचं दिसत आहे,” असेही अरोरा यांनी सांगितलं.