पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतासाठी स्वतंत्र संरक्षण धोरण आखल्यानंतर कोणीही भारताच्या सीमांना व त्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सांगितले. “२०१४  मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी स्वतंत्र संरक्षण धोरण नव्हते. एकतर संरक्षण धोरणाचे मार्गदर्शन करणारे परराष्ट्र धोरण होते किंवा परराष्ट्र धोरण संरक्षण धोरणाने आच्छादित होते. आज या उपक्रमामुळे कोणीही भारतीयांना आव्हान देऊ शकत नाही,” असे अमित शाह म्हणाले.

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) समारंभात ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशाच्या सेवेबद्दल बीएसएफच्या जवानांचा सत्कार केला. अमित शाह यांनी शनिवारी बीएसएफमधील अधिकारी व जवानांचा गौरव केला. यावेळी बोलताना गृहमंत्री म्हणाले, “घुसखोरी, मानवी तस्करी, गायींची तस्करी, शस्त्र तस्करी, ड्रोन ही सर्व आव्हाने आहेत पण बीएसएफवर माझा पूर्ण विश्वास आहे की ते सर्व आव्हानांवर मात करून सीमा सुरक्षा सुनिश्चित करतील.” गृहमंत्री म्हणाले, ‘ज्यांनी सर्वोच्च बलिदान दिले त्या लोकांना मी अभिवादन करतो कारण आपण सतर्क राहून देशाच्या सीमांचे रक्षण करत आहात हे संपूर्ण देशाला माहित आहे, म्हणूनच आज देश लोकशाहीने स्वीकारलेल्या विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे आणि त्या बलिदानाला कधी विसरता येणार नाही.”

जम्मू एअरबेसवर नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या संदर्भात अमित शाह म्हणाले की, डीआरडीओ आणि अन्य संस्था याला उत्तर देण्याची तयारी करत आहेत. “पाकिस्तान आधारित दहशतवादी संघटनांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सच्या वापराबाबत आपल्याला तयार राहायला हवं. हे सीमापलीकडून हल्ल्यांसाठी ड्रोन वापरण्यापलीकडे आहे,” असे शाह म्हणाले.

या समारंभाला राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा आणि निसिथ प्रमानिक, गृहसचिव अजय भल्ला आणि दोन गुप्तचर प्रमुख उपस्थित होते. बीएसएफचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी यावेळी भाषण केले.

बीएसएफचा हा सोहळा पहिल्यांदा २००३ साली आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर दरवर्षी बीएसएफचे पहिले महासंचालक आणि पद्म विभूषण पुरस्कार प्राप्त केएफ रुस्तम यांच्या जयंतीनिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. सुरक्षा दलाच्या निर्मितीत रुस्तम यांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांनी आपल्या दृष्टी, नेतृत्व आणि संघटन शक्तीच्या अतुलनीय क्षमतेने सीमा व्यवस्थापन क्षेत्रात व्यावसायिकदृष्ट्या कुशल बळाचा पाया रचला होता.

Story img Loader